Home > News Update > मुंबईत कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासात देण्याच्या सूचना

मुंबईत कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासात देण्याच्या सूचना

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळए आरोग्य व्यवस्थेवर येणार ताण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

मुंबईत कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासात देण्याच्या सूचना
X

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावे, रुग्णालयातील बेडचे व्यवस्थापन आणि ऑक्सिजनचा पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुंबईतील कोविड 19 संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतला.

कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱयांची प्रामुख्याने अँटीजेन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले तर त्यांचे विलगीकरण करुन, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरुन बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर कोरोनाचे निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच बाधित रुग्णांना बैड्स मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त बेडच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमध्ये साधारणत: १० फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे ८५ टक्के हे लक्षणे नसलेले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली.

मुंबईत एकूण १५३ कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० बेड्स आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल. १० फेब्रुवारीपासून आजमितीपर्यंत १०५० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता ८ ते १० हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱया रुग्णांची संख्या देखील १० हजाराच्या घरात आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज ३ हजार ९०० बेड्स उपलब्ध आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी निरनिराळ्या हॉटेल्स संलग्न करुन देण्यात येत आहेत.

रेमडिसीव्हीरबाबत प्रयत्न सुरु

रेमडेसीवीर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही, याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सांगून चहल म्हणाले की, रेमडेसीवीर इंजेक्शनच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. अधिक पुरवठा लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ६ समन्वय अधिकारी

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी महानगरपालिकेकडून ६ समन्वय अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आले आहेत. मुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ ऑक्सिजन पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत ऑक्सिजन उपलब्ध करुन देवू शकतील. तसेच खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱया अवाजवी बिलांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ३५ रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिल तयार होताच त्याचे स्वत:हून लेखापरीक्षण करण्यात येते.

Updated : 18 April 2021 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top