"मी ज्या घोषणा केल्या पाहिजे होत्या त्या तुम्ही करुन टाकल्या", मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले
X
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला प्रधान सेवक म्हणवून घेतात, त्यामुळे जनसेवा हे प्राधान्य असले पाहिजे, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असले तरी जनकल्याण हेच ध्येय असले पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. नवी मुंबई ते मुंबई या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन गुरूवारी झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनवाल हे ऑनलाईन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अस्लम शेख आणि अब्दुल सत्तार प्रत्यक्ष उपस्थित होते. मुंबईला आर्थिक राजधानी माना अथवा मानू नका पण मुंबई हे महत्त्वाचे केंद्र आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडतात, अनेकजण रोजगारासाठी मुंबईत येतात, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रकल्पासाठी सगळ्यांचे हातभार लागले, पण त्याचे श्रेय ना केंद्राचे आहे आणि राज्य सरकारचे आहे, हे जनतेसाठी केलेले काम आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. "पंतप्रधान स्वत:ला प्रधानसेवक म्हणवतात. त्यांचेही आभार मानतो. प्रत्येक ठिकाणी राजकारण असले पाहिजे की नाही ही बाब वेगळी आहे, पण जनसेवेलाच प्राधान्य दिले गेले पाहिजे" असा टोला त्यांनी लगावला. पण त्याचवेळी सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्र्यांनी चिमटाही काढला. " महाराष्ट्रासाठी काय करणार याबाबतच्या ज्या घोषणा मी करायला पाहिजे होत्या त्याची माहिती सोनोवाल यांनी आधीच देऊन टाकली" असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. पण केंद्राने या प्रकल्पात सहकार्य केले तसेच सहकार्य राज्य आणि केंद्र एकमेकांना करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.