अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य झाले!

उद्धव ठाकरे यांना जसं मुख्यमंत्री पद सहजा सहजी मिळालं नाही तसं आमदारकी देखील सहजासहजी मिळाली नाही. अनेक अडचणी नंतर झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार झाले. त्यानंतर आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली.

राज्यात ९ विधानपरिषदेच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली होती. ही निवडणूक बिनविरोध झाली. कोरोनाच्या संकटामुळं विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच इतर आठ आमदारांनी देखील शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे, भाजप चे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड यांच्यासह राष्ट्रवादी चे आमदार शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आणि काँग्रेस चे आमदार राजेश राठोड उपस्थित होते.

या शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते.