काय आहे ‘मिलकर’? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं उद्घाटन

CM Uddhav thackeray launches milkar to provide ration kits to help the needy in mumbai

‘मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व हातांमध्ये आहे, सगळे मिळून जेंव्हा काम करतात तेव्हा यश हे मिळेतच, त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण कोविड विषाणु विरुद्धचे हे युद्ध जिंकूच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजूवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेसचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

मुंबईकरांनी पुढे येऊन “मिलकर” व्यासपीठाच्या माध्यमातून काम आणि दान करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते https://milkar.ketto.org/covid19 या क्राऊड फंडिंग प्रणालीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका, कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वंयसेवी संस्थांनी एकत्रित येऊन हे व्यासपीठ विकसित केले असून ते भुकेल्या व्यक्तींना अन्न पुरवण्यासाठी एक माध्यम (सेतू) म्हणून काम करील.

गोदरेज अँण्ड बॉयसी, आरपीजी फाऊंडेशन, एटीई चंद्रा फाऊंडेशन हे या निधीत भरीव भर घालणार आहेत. एखाद्याने योगदान दिल्यास, त्याच्यामध्ये पाच पट भर घालून हा निधी संबंधित वॉर्डमधील लोकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

उदघाटनाच्या या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध कॉर्पोरेट हाऊसेस चे प्रतिनिधी, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात आर.पी.जी फाऊंडेशनच्या राधा गोयंका, अक्षय गुप्ता, केटूचे कुणाल कपूर, अनंत गोयंका यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठे केंद्र म्हणून प्लाटिना प्लाझमा सेंटरची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आली असून प्लाझमा बँक म्हणून हे केंद्र काम करील. कोविड विषाणुविरुद्ध लढतांना हे महत्वाचे पाऊल राज्य शासनाने टाकले आहे. मार्च महिन्यापासून राज्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला त्या दिवसापासून आतापर्यंत राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या. फक्त राज्य शासनाने हे काम केले का? तर नाही. हे काम कुण्या एकट्याचे नाही.

शासनासोबत अनेकांचे मदतीचे हात पुढे आले, त्या सर्व मदतीच्या हातांचा मला अभिमान वाटतो. कोरोना विषाणुविरुद्ध लढतांना खुप लोक, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस सहभागी होऊन काम करत आहेत. मिलकर हे त्यातीलच एक महत्वाचे व्यासपीठ आहे. मदत करणाऱ्या सर्व लोकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना पुढे जातांना काही अडचण आली तर शासन तुमच्यासमेवत आहे असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

‘मिशन बिगिन अगेन’ द्वारे पुढे जात असतांना कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढते आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन चालू पुन्हा बंद असे होते आहे. हे होत राहणार, पण मनातील भीती काढा आणि मदतीला पुढे या. जोपर्यंत कोरोना प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम सुरु ठेवायचे आहे. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात काही अडचणी येऊ शकतात, अशा परिस्थितीत शासनाला तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मिलकर व्यासपीठाच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत रेशनकिट पोहोचवणे शक्य होणार असून यामुळे मुंबईत कुणीही भुकेले राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगतांना त्यांनी मिलकरच्या टीमचे अभिनंदन करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या

मिलकर काय आहे?

कोविड विषाणुने आपल्या जीवनात अनेक महत्वपूर्ण पाठ शिकवले आहेत त्यापैकीच एक म्हणजे सामुहिक कृतीची शक्ती. मिलकर हा ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना गरजू लोकांशी जोडणारा सेतू आहे. हे सगळे लोक, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्वंयसेवी संस्थां, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी एकत्र येऊन भूक निर्मुलनासाठी सुरु केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे मिलकर.

यामध्ये जेवढी रक्कम दान होईल त्यात पाचपट रक्कम कॉर्पोरेट हाउसेस कडून टाकण्यात येणार आहे. मिलकर व्यासपीठाची हीच शक्ती आहे. यात प्रथम, युवा, चाईल्ड राईटस ॲण्ड यु, चाईल्ड हूड टू लाईव्हहूड, अक्षयपात्र, फ्रॉम यु टू देम, सलाम मुंबई, क्राय यासारख्या स्वंयसेवी संस्था ही सहभागी झाल्या आहेत.

मिलकरच्या माध्यमातून जे लोक मदत करू इच्छितात त्यांना ज्या वॉर्डमध्ये मदत करायची आहे तो वॉर्ड निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना या प्रभागात काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू व्यक्तीपर्यंत रेशनकीट पोहोचवता येईल. यात एक व्यक्ती,दोन व्यक्ती पाच व्यक्तीचे एक कुटुंब, पाच व्यक्तींचे दोन कुटुंब, पाच व्यक्तींचे चार कुटुंब अशापद्धतीने मदत देऊन त्यांना रेशन पुरवता येईल, त्यांच्या जेवणाचा खर्च उचलता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here