थप्पड देणे आणि खाणे हे आमचे आयुष्य, मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना कानपिचक्या
X
कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे, पण काही जणांना आमचे कौतुक परवडत, नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. जालनामधील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
कोरोना संकटकाळात करण्यात आलेल्या कामामुळे आपला उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा केला जातो, पण काहींना आपले कौतुक परवडत नाही, त्यांना पोटदुखी होते असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या एका सिनेमातील डॉयलॉगचा उल्लेख करत टोला लगावला आहे. थप्पड से डर नही लगता, पण कौतुक झाले की भीती वाटते, असे त्यांनी म्हटले. आमच्यासारख्या राजकारणातल्या लोकांचे थप्पड देणे आणि खाणे सुरूच असते. त्यामुळे थोडे जरी कौतुक झाले की भीती वाटते, असे त्यांनी यावेळी सांगितले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नुसत्या चकाचक प्रशासकीय इमारती उभारुन काही होणार नाही, सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली वागणूक सुधारली पाहिजे, असेही आवाहन केले.