Home > News Update > पोलिसांच्या प्रयत्नांना यश, वेठबिगारीच्या पाशात अडकलेली चिमुकली सापडली

पोलिसांच्या प्रयत्नांना यश, वेठबिगारीच्या पाशात अडकलेली चिमुकली सापडली

पोलिसांच्या प्रयत्नांना यश, वेठबिगारीच्या पाशात अडकलेली चिमुकली सापडली
X

अवघ्या 500 रुपयांमध्ये मेंढपाळाने मुलगी खरेदी केली होती. या प्रकरणी जव्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र 6 वर्षीय मुलगी बेपत्ता होती. परंतू पोलिसांनी अखेर 6 वर्षीय मुलीचा शोध घेत मुक्तता केली.

काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्ह्यातील गौरी नावाच्या 11 वर्षीय मुलीचा वेठबिगारीतून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर राज्यातील वेठबिगारीच्या भीषण वास्तवावर प्रकाश पडला. त्यापाठोपाठ पालघर जिल्ह्यातील 6 वर्षीय मुलगी अवघ्या 500 रुपयात खरेदी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मेंढपाळाच्या ताब्यात असलेली मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले होते. परंतू पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेमुळे अखेर 6 वर्षीय मुलीची वेठबिगारीतून मुक्तता करण्यात आली.

स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी नरेश भोये यांचे कुटुंब पत्नी कुसुम, मुलगी मनीषा (वय 8 वर्ष) व दुसरी मुलगी काळू (वय 6 वर्ष) हे 2019 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तळेगाव येथे मजुरीसाठी गेले होते. तेथे त्यांना अवि नवल्या यांच्याकडे खडी फोडण्याचे काम मिळाले. या कामातून भोये कुटूंबाला खडी फोडून ट्रॅक्टर भरल्यानंतर 400 रुपये मजुरी मिळत होती. त्यात कुटूंबाची कुजराण होत नव्हती. हेच हेरून मेंढपाळ पुंडलिक कादंडकर यांनी या कातकरी कुटूंबाची भेट घेतली. तसेच आम्हाला तुझी एक मुलगी मेंढर चारण्यासाठी दे, त्या बदल्यात तुला एक मेंढरू व 12 हजार रुपये वर्षाचे देतो, असे सांगितले. गरिबीची परिस्थिती असल्याने मुलीचे वडील नरेश हे तयार झाले. यावेळी मेंढपाळाने फक्त 500 रुपये दिले व मुलीचा ताबा घेतला. या घटनेला तीन वर्षे पुर्ण झाले आहेत. 3 वर्षापासून मुलगी मेंढपाळाकडे आहे. या मुलीकडून मेंढरं चारणे, शेण काढणे, दूध पाजणे अशी अनेक कामे करून घेतली जात होती. त्याचबरोबर 28 मार्च 2021 रोजी देवराम कांदडकर व पुंडलिक कांदडकर यांनी या कुटूंबाची भेट घेऊन तुमची दुसरी लहान मुलगी आमच्या मेंढ्यांची साफसफाई करण्यासाठी द्या, अशी मागणी केली. या दुसऱ्या मुलीच्या बदल्यात वर्षाला 12 हजार आणि एक मेंढर देण्याचे कबूल केले आणि दुसरी मुलगी देखील घेऊन गेले.

या दोन्ही प्रकारे प्रलोभन दाखून आणि भोये कुटूंबाच्या अज्ञानाचा फायदा घेत चिमुकल्या मुलीची प्रचंड पिळवणूक केली. त्यानंतर मेंढपाळाने मुलींनी केलेल्या कामाचा मोबदलाही दिला नाही, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. त्यातच नाशिक येथील 11 वर्षीय मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणाने वेठबिगारीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी मेंढपाळाने मुलीला शिरपमाळ येथे सोडून पळ काढला. मात्र या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेला मिळाली. त्यांनी वेठबिगारी कायद्यांतर्गत जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर मुलगी नाशिक येथील महिला व बालविकास विभागाच्या आश्रमात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या 6 वर्षीय मुलीची सुटका झाली. मात्र अहमदनगर, नाशिक, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अनेक कातकरी कुटूंब वेठबिगारीच्या पाशात अडकले आहेत. त्यांनाही वेठबिगारीच्या पाशातून मुक्त करण्याची गरज आहे, असे मत श्रमजीवी संघटनेच्या सीता घाटाळ यांनी व्यक्त केले.


Updated : 29 Sep 2022 2:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top