एकमेकांला सहकार्य करून महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू- मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगभरातील मराठी उद्योजकांशी संवाद साधला, यावेळी एकमेकांला सहकार्य करून महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
X
मुंबई :कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी तसेच मराठी युवकांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांला सहकार्य करून महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला, या संवादात उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, यांच्यासह आमी परिवाराचे सदस्य सहभागी होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, आपण मायभूमीपासून दूर गेलात, पण तुमची पाळेमुळं इथेच आहेत.
तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. तुमचा अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतो, अस मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.
उद्योग मंत्री देसाई म्हणाले, आपण सर्वांनी सातासमुद्रापार जाऊन महाराष्टाची मुद्रा उमटवली आहे. आपला प्राणप्रिय भगवा फडकवला आहे. आप-आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.






