Home > News Update > एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वादग्रस्त अधिकाऱ्याला लागली लॉटरी!

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वादग्रस्त अधिकाऱ्याला लागली लॉटरी!

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर वादग्रस्त अधिकाऱ्याला लागली लॉटरी!
X

शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जशी मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली. तशीच लॉटरी आता त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना द्यायला सुरूवात केली आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार जे सध्या निवृत्त आहेत त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अर्थात 'वॉर रुम'च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवं सरकार स्थापन झाल्यापासून एकामागोमाग एक निर्णयांचा सपाटाच लावला आहे. नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या चार खांद्यांवरच राज्याची धुरा आहे. आता हे दोघेही जे काही निर्णय घेतील ते अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात पायाभुत सुविधा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे ज्याला वॉर रूम असंही म्हटलं जातं. या वॉर रूमच्या महासंचालकपदी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अगदी खास असलेले वादग्रस्त निवृत्त अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची नेमणूक केली आहे. महत्वाचं म्हणजे फडणवीस सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकदेखील राधेश्याम मोपलवारच होते.





राधेश्याम मोपलवार हे सरकारी सेवेत असताना त्यांच्यावरील आरोपांमुळे विधानसभेचं एक दिवसाचं कामकाज वाया गेलं होतं. शासकीय सेवेतील सनदी अधिकाऱ्यामुळे विधिमंडळाचं कामकाज तहकूब केलं गेल्याचा राज्याच्या इतिहासातील हा एकमेव प्रसंग आहे. मोपलवार यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होऊनही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने त्यांना अभय दिलं होतं. २०१८ मध्ये निवृत्ती होऊनही त्यांना मुदतवाढही देण्यात आली होती

सगळ्यात महत्वाचं म्हणजे राधेश्याम मोपलवार यांच्या या नियुक्तीचा कालावधीच निश्चित करण्यात आलेला नाही. ते रुजू होण्याच्या तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढील आदेशापर्यंत ही नियुक्ती असणार आहे, असं शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मोपलवार यांना फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या काळात वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. आजपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त असल्यानेच मोपलवार यांना झुकते माप मिळत गेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी लगेच मुख्यमंत्री कार्यालयातच मोपलवार यांची वर्णी लावल्यावने मंत्रालयात अनेक नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे.





कोणत्या प्रकरणात मोपलवार ठरले होते वादग्रस्त?

एक कोटीच्या बेहिशेबी व्यवहाराची रेकॉर्डींग सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर राधेश्याम मोपलवार हे वादग्रस्त ठरले होते. रेकॉर्डींगमध्ये मोपलवार यांच्याशी संभाषण करणाऱ्या व्यक्तीला फडणवीस सरकारच्या काळात 'मोक्का' कायद्यांतर्गत अटक देखील करण्यात आली होती. यानंतर राधेश्याम मोपलवार हे पूर्णपणे निर्दोष असल्याचा निर्वाळा तेव्हा फडणवीस सरकारने दिला होता.

Updated : 28 July 2022 4:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top