Home > News Update > भाजपवाले तुमचे जावई आहेत का? शिवजयंतीच्या बॅनरवरून धुळ्यात रंगला कलगितुरा

भाजपवाले तुमचे जावई आहेत का? शिवजयंतीच्या बॅनरवरून धुळ्यात रंगला कलगितुरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त लावण्यात येणाऱ्या बॅनरवरून धुळे शहरात चांगलाच वाद रंगला आहे. त्यात भाजपवाले तुमचे जावई आहेत का? असा सवाल धुळ्यातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

भाजपवाले तुमचे जावई आहेत का? शिवजयंतीच्या बॅनरवरून धुळ्यात रंगला कलगितुरा
X

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण धुळे शहरांमध्ये मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Municipal Corporation) आवारात आणि चक्क महानगरपालिकेमध्येच बॅनर लावल्याने आता धुळे मनपात बॅनर वॉर सुरू झाले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत धुळे शहरात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क धुळे महानगरपालिकेमध्ये अभिवादनाचे बॅनर लावण्यास सुरवात केली आहे. याआधी या सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेऊन धुळे महानगर पालिकेच्या आवारात कोणीही कुठल्या प्रकारचे बॅनर अथवा बोर्ड मंडप लावू नये, असे कायदेशीर आदेश असताना तुम्ही त्यांचे बॅनर हटवावे असे लेखी निवेदन दिले होते. मात्र धुळे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या गेट जवळ भले मोठे बॅनर लावले. त्यापाठोपाठ धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क धुळे महानगरपालिकेच्या आत मध्येच बॅनर लावल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

जातीयवादी मनपा प्रशासन दरवर्षी महानगरपालिके जवळील आमचे बॅनर काढतात. मात्र धुळे मनपात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे बॅनर का काढत नाहीत? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यानी उपस्थित केला आहे. भाजपा वाले काय तुमचे जावई आहेत का.? असा तिखट प्रश्न सुद्धा या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे, डॉ.नागसेन बागुल, शंखर खरात आणि किरण गायकवाड यांनी धुळे महानगर पालिकेच्या आत आता बॅनर लावले. त्यानंतर अखेर धुळे महानगरपालिका प्रशासनाला आपण घालून दिलेल्या नियमांची आठवण झाली आणि त्यांनी ताबडतोब सायंकाळी उशिरा धुळे महानगरपालिका आवारात असलेले सर्वच बॅनर उतरवण्यात सुरुवात केली. आता हे बॅनर कोणी लावले होते? याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी दिली.

Updated : 3 Feb 2023 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top