Home > News Update > सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
X

सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या 'कोविशिल्ड' या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातही या लसीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरु होत्या. ही भारतातील पहिली लस ठरली.

कोविशिल्ड या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळंच कोरोनाला भारतातून संपवण्यात कोविशिल्ड हे मुख्य हत्यार ठरणार आहे.

'कोविशिल्ड' ची किंमत काय असणार?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच कोविशिल्डचं उत्पादन करत आहे. सीरममध्ये कोविशिल्डचे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींकडूनही कोविशिल्डची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सीरमला भेट दिली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी लसीबद्दलची सगळी माहिती घेतली. किती प्रमाणात उत्पादन सुरु आहे? लस किती प्रभावी ठरु शकते? लस साठवण्यासाठी काय करावं लागेल? लसीकरण कार्यक्रम राबवताना सीरमची कशी मदत होईल? याबाबतची सगळी माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली. त्यानंतरच सीरमच्या लसीला सर्वात आधी मान्यता मिळेल ही शक्यता वर्तवली जात आहे.

कोट्यवधी डोस तयार करण्याची सीरमची क्षमता

'कोविशिल्ड' बाबत भारतासाठी चांगली गोष्ट ही की, या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. सीरम इन्स्टिट्युट ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची लस निर्मिती क्षमता अफाट आहे. आतापर्यंत सीरममध्ये तब्बल 5 कोटी कोविशिल्ड तयार झाल्याची माहिती आहे. तर जुलै 2021 पर्यंत सीरमनं तब्बल 30 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विकसनशील देशांना लस पुरवण्यासाठी सीरमनं ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीबरोबर करार केला आहे.

ऑक्सफर्डच्याच कोविशिल्डची निवड का?

जगभरात एवढ्या लसी तयार झाल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेक लसी तिसऱ्या टप्प्यातही यशस्वी ठरल्या आहे, मग कोविशिल्डला मान्यता देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कोविशिल्ड या लसीचं उत्पादन पुण्यात होत आहे, त्यामुळं भारतात तिची वाहतूक सहज शक्य आहे, त्यामुळं वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. शिवाय कोविशिल्डला अतिथंड तापमानाची गरज लागत नाही. इतर लसींची उणे 40 ते 50 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात साठवण करावी लागते, आपल्याकडे प्रत्येक भागात ही क्षमता अजूनतरी नाही. मात्र, त्याचवेळी कोविशिल्ड ही लस सहज साठवता येऊ शकते. आणि कोविशिल्ड ही लस निवडण्याचं तिसरं कारण आहे किंमत, या लसीची किंमत अतिशय कमी आहे. अवघ्या 500 ते 600 रुपयांना ही लस मिळणार आहे. जगातील इतर लसींशी तुलना केली तर ही किंमत नाममात्र आहे. त्यामुळंच कोविशिल्डला सरकार प्राधान्य देण्याच्या विचारात आहे.

लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवला जाणार?

कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे महालसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकींग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.

लसीकरण बूथवर लसीकरण कसं होणार?

लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला ऑब्जरवेशन रुममध्ये पाठवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.

Updated : 1 Jan 2021 12:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top