कोरोनाशी लढणाऱ्या मध्य प्रदेशात राजकारण! अखेर होणार मंत्रिमंडळ विस्तार

मध्यप्रदेश मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहान, नरेंद्र मोदी, अमित शहा, ज्योतिरादित्य सिंधिया. कोरोना व्हायरस
Courtesy: Social Media

मध्य प्रदेशात सत्तांतर झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण तब्बल २९ दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्याला आरोग्यमंत्री, गृहमंत्री नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सातत्याने केली होती. त्यानंतर अखेर शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मंगळवारचा मुहूर्त मिळला आहे.

आज ५ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नरोत्तम मिश्रा, कमल पटेल, मीना सिंग, तुलसी सिलवत आणि गोविंद सिंग राजपूत यांचा आज शपथविधी होणार आहे. सिलवत आणि राजपूत हे दोघे ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या गटातील आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या बंडानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांची राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर देशभरात कोरोनाचा धोका वाढलेला असतानाच्या काळात शिवराजसिंह चौहान यांनी २३ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता.

मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या चौदाशेंच्या वर पोहोचली आहे. या संकटाच्या काळात भाजपनं सरकार स्थापन केले पण राज्यातील परिस्थिती हातळण्यासाठी मंत्रीच नसल्याची स्थिती होती.