सांगा कुठं शाळा शोधत जातील, ही चिमुकली पावलं?

32

दिल्लीतल्या राजधानी शाळेत मनोज शिपाई आहे. ६० तास कुठेतरी लपून बसल्यामुळे जिवंत आहोत, असे तो रडत रडत सांगत होता. बरीच शाळा जळून नष्ट झाल्याचे चित्रात दिसत होते. सगळे जाळले, आता मुलं कशी शिकतील? हताश होऊन मनोज पत्रकाराला उलट विचारतो. मनोजच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीत. सोमवारी बोलावलेले पोलिस बुधवारी पंचनामा करायला आल्याचं तो सांगतो. ६० तास तो कुठं, कसा लपून राहिला असेल? आपण चक्रावून जातो.

दुसऱ्या एका शाळेतलं अत्यंत भीषण दृश्य बघितलं टिव्हीच्या पडद्यावर. काहीच शिल्लक राहिलं नाहीये. मुलांचे बसायचे बाक, सगळी कागदपत्रं, पुस्तकं काही काही शिल्लक नाहीये. इथं शाळा होती, असेही कोणी मान्य करणार नाही, इतकं चित्र बदललंय! शेजारच्या तीन मजल्याच्या इमारतीवरुन दंगलखोर रस्सीने खाली शाळेत उतरले. ते खाली सोडलेले दोर तिथेच लोंबकळताहेत. थंड डोक्यानं सगळं पेटवलंय. खाक झालंय सगळं काही. मला हे दृश्य बघताना गलबलून आलं. #NDTVवरचा सौरव शुक्लाचा रिपार्ट मनात अस्वस्थता पेरत आणि काळीज चिरत गेला. पुरता हादरुन गेलो हे सारं बघून. (त्याच दिवशी मी दिल्लीत पोहोचलो होतो…)

स्थिती निवळेल. मुलं शाळेत जातील. तेव्हा शाळेचा कोळसा झाल्याचे बघून त्यांना काय वाटेल? त्यांच्या प्रिय शाळेचं असं नष्ठ होणं कोण? कसं समजून सांगेल त्यांना? काय उमटेल त्यांच्या बालमनाच्या कोऱ्या पाटीवर? शाळेच्या कोणत्या आठवणी सोबत घेऊन जगतील ही कोवळी लेकरं? नवीन शाळा शोधत कुठं जातील ही चिमुकली पावलं? त्यांना दाखला कोण देईल, कसा?
हे राक्षसांनो…

तुम्ही शाळेची इमारत, मुलांच्या वह्या-पुस्तकं, बाकच नाही तर मुलांचे भविष्य जाळून टाकलं आहे. तुम्ही जे कोणी याला जबाबदार आहात, ते सारे मुलांचे गुन्हेगार आहात. तुम्ही सुखानं मरणार नाहीत…

Comments