News Update
Home > News Update > सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे जनक बुद्ध

सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे जनक बुद्ध

प्रज्ञा शील करुणेची पेरणी करणाऱ्या बुद्धाने स्वस्थ समाज निर्मितीसाठी चा विचार देऊन अर्थशास्त्राचे सूक्ष्म सिद्धांत मांडून त्या आधारे मार्गाक्रमण केल्यास गरीबी, भूक, निरक्षरता इत्यादी सामाजिक व आर्थिक समस्या दूर होतील अशी भूमिकाबुद्ध जयंती निमित्त विशेष लेखातून मांडली आहे, लेखक विचारवंत भी.म.कौसल यांचा लेख बुध्द पौर्णिमेनिमीत्त पुनः प्रकाशित करीत आहोत.

सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे जनक बुद्ध
X

जागतिकीकरणाच्या सध्याच्या युगात आर्थिक विकास हाच मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याचे दिसते. आर्थिक विकासाच्या अनुषंगाने समाजाच्या प्रगतीला चालना मिळाली तर वावगे वाटण्याचे काही कारण नाही. राष्ट्राचा विकास हा शेवटी प्रत्येक व्यक्तिच्या विकासावर अवलंबून असतो. मनुष्यामधील समाज हा राष्ट्राची उभारणी करतो. तथापि सध्या तसे चित्र दिसत नाही. आर्थिक विकासाची फळे काही ठराविक लोकांनाच चाखावयास मिळतात. सामान्य माणूस मात्र त्याच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. प्रगतीच्या नावावर मनुष्य भौतिक साधन संपत्तीचा गुलाम बनला आहे.

मनुष्याची आंतरिक प्रगती वृद्धिंगत व्हावी जेणेकरून ख-या अर्थाने समाजाच्या प्रगतीला चालना मिळेल या दिशेने प्रयत्न करण्याची कुणालाही गरज भासत नाही. परिणामी मानवी मूल्यांचा झपाट्याने ह्रास होत आहे. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली. चंद्र आणि मंगळ मोहिमा त्याने यशस्वी केल्या.परंतू नैतिक मूल्यविरहित ही प्रगती कितीही वेगाने पुढे गेली तरी एकवेळ अशी येईल की मनुष्य आणि प्राणी यांच्या व्यवहारात फरक करणे कठीण होईल. अशा या निराशाजनक परिस्थितीत सामाजिकदृष्ट्या स्थीर अर्थव्यवस्थेची भारतालाच नव्हे तर जगाला नितांत आवश्यकता आहे, ज्या व्यवस्थेत मनुष्याच्या अत्त्युच्य नैतिक विकासाला व मानवी मूल्यांना प्राधान्य असेल. बुद्धाच्या विचारावर आधारीत सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणारी आधुनिक आणि प्रगतीशील व्यवस्था निर्माण झाल्यास या स्थितीवर मात करणे सहज शक्य आहे. कारण बुद्धाचा विचार हा भौतिक विकासाबरोबर मनुष्याच्या आंतरीक प्रगतीला चालना देणारा आहे.

सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार

मनुष्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणाशिवाय तो आपली भौतिक व आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. समाजाच्या प्रगतीसाठी व शांततामय सहजीवनासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक उन्नतीला देखील चालना मिळते. वैचारीक शक्ती प्रगल्भ होते. समाजाच्या निकोप वाढीसाठी शिक्षण अत्यावश्यक असल्यामुळे लिंग, जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता शिक्षण सर्वांना मिळावे असा विचार बुद्धाने हिरीरिने मांडला. दीघनिकायातील लोहिच्च सुत्तामध्ये बुद्ध आणि लोहिच्च ब्राह्मण यांच्यात सालवाटिका नामक गावात जो विस्तृत संवाद झाला त्यावरून ही बाब स्पष्ट होते. मनुष्याने शैक्षणिकदृष्ट्या बहुश्रुत होण्याची सूचना बुद्धाने केलेली आहे. याबाबतचा उल्लेख सुत्तनिपातातील महामङ्गल सुत्तात आढळतो. यामध्ये प्रामुख्याने तीन बाबींचा उल्लेख आहे. यात यशस्वी उद्योग करण्यासाठी यासंबंधातील पहिली बाब म्हणजे सर्वसामान्य शिक्षण (बहुश्रुत होणे) आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दुसरी बाब म्हणजे उद्योग किंवा व्यापार करण्यासाठी त्यातील कौशल्य प्राप्त करणे आणि तिसरा व तेवढाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व यशस्विरित्या पार पाडण्यासाठी उच्च प्रतीची मानसिक एकाग्रता अत्यंत गरजेची असल्याचे प्रतिपादन बुद्धाने केले आहे.

संपत्तीची निर्मिती व समन्यायी वाटप

अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य या मनुष्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संपत्तीची गरज भासते. त्यासाठी आर्थिक स्थैर्य आवश्यक असल्याने संपत्तीच्या संदर्भात महत्त्वाच्या तीन बाबींची बुद्धाने अंगुत्तर निकायातील व्याग्घपज्ज सुत्तात चर्चा केली आहे. त्या तीन बाबी अशा-

१) उत्थान संपदा ( कुशल व प्रामाणिक प्रयत्नांद्वारे संपत्तीची निर्मिती करणे )

२) आरक्ख संपदा ( संपत्तीची सुरक्षा व बचत ) आणि

३) समजीविकता ( संपत्तीच्या मर्यादेत राहून खर्च किंवा संपत्तीचे योग्य विनियोजन करणे ) याच सुत्तात बुद्धाने सुखी जीवन जगण्यासाठी चार मुद्यांवर जोर दिला आहे. यात सोपविलेले काम यशस्वीपणे पूर्ण करणा-या मनुष्याच्या गुणांची चर्चा आहे. ज्यात हातातील काम मन लावून न थकता आणि उत्साहाने पूर्ण करणे, दुसरा मुद्दा योग्य मार्गाने जे कमविले आहे त्याचे जतन करणे, तिसरी बाब नैतिकदृष्ट्या उत्तम आणि सह्रदयी मित्रांची संगत, आणि चौथा व शेवटचा मुद्दा मिळकतीचे संतुलन राखणे होय. संपत्तीच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बुद्ध त्या काळात प्रचलित सहा प्रकारच्या व्यवसायांची प्रामुख्याने चर्चा करतात. त्या सहा बाबी अशा- १) शेती, २) व्यापार ( बेकायदेशीर शस्त्र व्यापार, मादक पदार्थांचा व्यापार आणि विषाचा व्यापार वगळून ), ३) पशूपालन, ४) रक्षा सेवा, ५) शासकीय सेवा, आणि ६) व्यावसायिक सेवा. या व्यवसायाच्या माध्यमातून संपत्ती अर्जित करण्याला बुद्धाने मान्यता दिलेली आहे. संपत्ती निर्मितीचे हे मार्ग समाजातील सर्व घटकांशी निगडीत आहेत. एवढेच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देणारे आहेत. मनुष्याने आपल्या गरजा भागविण्यासाठी संपत्ती मिळविण्यात काहीही आक्षेपार्ह नाही. मात्र अनाठायी संपत्ती संचय करण्याच्या प्रवृत्तीचे गुलाम बनता कामा नये असा इशारा देण्यास बुद्ध विसरत नाही. कारण असे करणे मनुष्याच्या भौतिक व मानसिक सुखासाठी घातक ठरते. एखाद्या व्यक्तिकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संपत्ती असेल तर स्वत:च्या कुटुंबाबरोबर अन्य नातेवाईक, मित्र आणि गरजूंना मदत केल्यास व्यक्तिच्या आत्मिक समाधानाबरोबर समाजाच्या नैतिक विकासाला हातभार लागतो. संपत्तीचे समन्यायी वाटप, सुयोग्य नियोजन व योग्य गुंतवणुकीमुळे शांती आणि प्रगतीबरोबरच अपराधमुक्त समाज निर्मिती शक्य असल्याची चर्चा दीघनिकायातील कूटदन्त सुत्तात आढळते. याच सुत्तात बुद्धाने आर्थिक विकासाची संकल्पना देखील मांडलेली आहे. यामध्ये गरिबीचे संपूर्ण उन्मूलन, सर्वांना रोजगार, लोकांच्या मुलभूत गरजा भागविण्याची हमी आणि पर्यावरण संरक्षण या बाबींचा समावेश आहे. यातून बुद्धाची आर्थिक विकासाची दूरदृष्टी लक्षात येते. आधुनिक आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांवर नजर टाकल्यास बुद्धाचे त्याकाळात मांडलेले मुद्दे आजही किती प्रासंगिक आहेत, याची प्रचिती येते. मिळकतीचा केवळ स्वतःसाठीच वापर करणे मनुष्याच्या अधःपतनाचे कारण ठरु शकते, याची चर्चा दीघनिकायाच्या पराभव सुत्तात आढळते. संपत्तीचा उपयोग वैयक्तिकरीत्या करण्याऐवजी सामूहिकरीत्या करण्यात यावा, अन्यथा गरिबीला चालना मिळण्याचा मुद्दा बुद्धाने संयुक्त निकायाच्या कोसम्बिय सुत्तात मांडलेला आहे. इतरांना संपत्तीचा वाटा न देता केवळ वैयक्तिक समाधानासाठी उपयोग केल्यास समाजात द्वेष, ईर्षा, मत्सर आणि गोंधळ निर्माण होतो, असे अंगुत्तर निकायातील व्याग्घपज्ज सुत्तात म्हटले आहे. भारतातील आजची परिस्थिती पाहता देशातील नव्वद टक्के संपत्ती मूठभर लोकांच्या ताब्यात आहे. परिणामस्वरुप देशात सामाजिक व आर्थिक असंतोषाला चालना मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

कामगार कल्याण

त्याकाळात कामगारांची अवस्था गुलामासारखी होती. कारण हा वर्ग शूद्र वर्णात मोडत असल्यामुळे सेवा करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे असा समज प्रचलित होता. संपत्ती निर्मितीत या वर्गाच्या श्रमाचे महत्त्वाचे योगदान असले तरी त्यांच्या सुखसोयीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत होते. भगवान बुद्ध प्राचीन भारतातील पहिले विचारवंत होते ज्यांनी श्रमिक वर्गाच्या कल्याणाची काळजी घेण्याचे आवाहन केले. याविषयीचा उल्लेख दीघनिकायातील सिगालोवाद सुत्तात आढळतो. या सुत्तात कामगार आणि मालक यांचे संबंध कसे असावेत विशेषतः कामगारांप्रति मालकाची जबाबदारी काय असावी याविषयी सांगताना बुद्ध म्हणतात 1)मालकाने कामगारांच्या क्षमतेनुसार कामाचे वाटप करावे.

2)कामगारांना पुरेसे वेतन व भोजन द्यावे.

3)श्रमिकांच्या आजारपणात त्यांची उचित देखभाल करावी आणि

4)रजा व निवृत्तीचे फायदे वेळेवर द्यावे.

वरील तरतूदींकडे पाहता बुद्धाची श्रमिकांविषयीची तळमळ आणि दूरदृष्टी लक्षात येते. आजच्या राज्यकर्त्यांना यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

बचतीचे महत्त्व आणि प्रोत्साहन

केवळ संपत्ती अर्जित करणे पुरेसे नसून योग्य मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे चोरी, आग, पूर इत्यादीपासून संरक्षण करणे मनुष्याचे कर्तव्य आहे. कारण संपत्तीमुळे मनुष्य आपल्या भौतिक गरजांची पूर्तता करतो. बुद्धाने बचतीचा सतत पुरस्कार केला आहे. कारण बचतीमुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते. उद्योग धंद्याच्या वाढीसाठी कर्जाच्या माध्मातून पैसा उभारण्याची प्रथा बुद्धाच्या काळातही प्रचलित होती. पाली साहित्यात बुद्धाचा समकालीन व्यापारी (श्रेष्ठी) अनाथपिंडिक आदी अनेक व्यापारी लोकांचा उल्लेख आढळतो. हे व्यापारी राज्याबरोबरच सामान्य लोकांना देखील कर्ज देत असत. तथापि बुद्धाने गरजेपेक्षा जास्त कर्ज काढण्याच्या प्रवृत्तीचा विरोध केला आहे. कर्जमुक्त जीवन सुखकारक असल्यामुळे कर्जमुक्त समाज निर्मितीचा बुद्धाने पुरस्कार केला आहे. दीघनिकायातील सामञ्ञफल सुत्तात बुद्ध एकांत जीवन जगणा-या श्रमणाची तुलना सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त व बचतीतून स्वत:च्या कुटूंब व मुलांची योग्य पद्धतीने देखभाल करणा-या व त्यातून मिळणा-या सुखी व्यक्तिशी करतात. याच सुत्तात मनुष्याने कर्ज घेऊन स्वतःचा आर्थिक विकास कसा साधावा व सुखी व्हावे याचीही चर्चा करण्यात आली आहे. यात कर्जाचा वापर उत्पादक कार्यासाठी करणे आणि लवकरात लवकर कर्जाची परतफेड करण्याची सूचना देण्यात आली आहे. कर्ज वेळेवर अदा न केल्यास सावकाराकडून अपमानित होण्याचा प्रसंग येऊ शकतो असा इशाराही बुद्धाने दिला आहे. मिळकतीचा योग्य वापर आणि त्यातून करावयाच्या बचतीचे महत्त्व बुद्धाने दीघनिकायाच्या सिगालोवाद सुत्तात विशद केले आहे. सिगाल( श्रृगाल ) नावाच्या गृहपती पुत्राला त्याच्या बचतीचे चार भाग करण्यास सांगीतले. एक भाग त्याच्या व कुटूंबियांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी, दोन भाग व्यापार उदीमात गुंतवणूक करण्यासाठी व चौथा भाग आणिबाणीच्या कठीण प्रसंगी खर्च करण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

संपत्तीचे सुयोग्य विनियोजन

मनुष्याने त्याच्या कुटुंबाच्या कल्याणाकरिता संपत्तीचा विनियोग कसा करावा याची तपशीलवार चर्चा अंगुत्तर निकायातील पत्तकम्म सुत्तात आढळते. १) अन्न, वस्त्र व अन्य गरजांवरील खर्च, २) पत्नी, मुले, आईवडील व नोकराच्या देखभालीचा खर्च, ३) आजारपण व अन्य कठीण प्रसंगी करावयाचा खर्च, ४) दानधर्म करण्यासाठी करावयाचा खर्च आणि ५) राज्याचे कर वेळेवर भरणे, मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ आवश्यक बाबींसाठी करावयाचा खर्च, नातेवाईकांसाठी करावयाचा खर्च, अभ्यागतांसाठी करावयाचा खर्च ईत्यादी बाबींचा यात प्रामुख्याने समावेश आहे. खर्चाच्या या तपशीलाकडे बारकाईने पाहिल्यास समाज जीवनातील प्रत्येक बाबींचा विचार केल्याचे दिसून येते. समाजाचा गाडा योग्य पद्धतीने चालण्यासाठी आवश्यक बहुतेक सर्व बाबी यात आढळतात. बुद्धाने केवळ आध्यात्मिक विकासाकडेच नव्हे तर समाजाच्या दैनंदिन व्यावहारीक बाजुंचाही अतिशय सुक्ष्म पद्धतीने विचार केला असल्याचे यावरून दिसते.

आज विकासाचे भ्रामक चित्र निर्माण करण्याची अहमहमिका लागली असल्याचे आपणास पाहावयास मिळते. आर्थिक विकासाचे आधुनिक सिद्धांत गरीबी उन्मूलन कार्यक्रमावर भर न देता भौतिक प्रगतीवर अधिक भर देतात, ही खरोखर मोठी शोकांतिका आहे. भौतिक विकासाच्या आजच्या संकल्पनेत प्रगतीच्या नावावर नागरी भागातील विकासावरच अधिक लक्ष केंद्रित झाल्याचे दिसते. जसे शहरांची स्वच्छता, सुंदर उद्याने, अत्याधुनिक कार्यालये व औद्योगिक आस्थापनांच्या उत्तुंग इमारती, घरगुती वापराच्या अत्याधुनिक सुखसोयी, महागड्या मोटारगाड्या इत्यादीमुळे असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की आपल्या देशात सर्वकाही ठिकठाक आहे. परंतू आर्थिक विकासाच्या या घोडदौडित सामान्य माणूस व त्याच्या गरजांचे प्रतिबिंब कुठेच दिसत नाही. अर्जून सेनगुप्ता आयोगाच्या अहवालाने हे विदारक सत्य निदर्शनास आणले आहे. त्यानुसार भारतात आजही ८३.६० कोटी लोकांची आवश्यक गरजा भागविण्यासाठी दररोज २० रूपये खर्च करण्याची ऐपत नाही. भारतात अन्नधान्याची कमतरता मुळीच नाही तर आपली अर्थव्यवस्था ही पूर्णत:आत्मकेंद्रित आणि भौतिक व व्यापारी उद्दिष्टांवर आधारित आहे. ही व्यवस्था मानव विकास केंद्रित असणे अत्यंत गरजेचे आहे. देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध असूनही लोक अर्धपोटी उपाशी राहतात याचे मुख्य कारण राजकीय इच्छाशक्तिचा अभाव आणि आपले विकासाचे कार्यक्रम हे चुकीच्या प्राधान्यक्रमावर आधारित आहेत, हे होय. भूक व गरीबी उन्मूलन कार्यक्रमासाठी आर्थिक संसाधनाचा वापर करण्याऐवजी ही संसाधने अन्यत्र वळविण्यात येतात. जर लोकांना पुरेसे अन्न मिळाले नाही तर कुपोषणासारख्या देशाच्या प्रगतीला बाधक ठरणा-या समस्या निर्माण होतील. या पार्श्वभूमिवर आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाचे नव्याने नियोजन करण्याची गरज आहे.

या सर्व मुद्यांचा विचार करता असे दिसते की स्वस्थ समाज निर्मितीसाठी आवश्यक सर्व बाबींची बुद्धाने अतिशय सांगोपांगरित्या चर्चा केली आहे. अर्थशास्त्राचे सूक्ष्म सिद्धांत यातून दृष्टोत्पत्तीस येतात. या सिद्धांताच्या आधारे मार्गाक्रमण केल्यास गरीबी, भूक, निरक्षरता इत्यादी सामाजिक व आर्थिक समस्या दूर होतील यात शंका नाही.

भि.म.कौसल

Updated : 2022-05-16T08:44:17+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top