News Update
Home > News Update > मोदी सरकारने पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवले, पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद

मोदी सरकारने पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवले, पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद

मोदी सरकारने पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवले, पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद
X

केंद्र सरकारने पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवत आता अधिकाऱ्यांना अटक, तपास आणि जप्तीचे अधिकार दिले आहेत. दरम्यान, हा अधिकार भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या 50 किमीच्या परिघात बीएसएफला देण्यात आला आहे.

सोप्या भाषेत सांगायचंच तर, आता बीएसएफ दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय आणि वॉरंटशिवायही या अधिकारक्षेत्रात अटक आणि तपास करू शकणार आहे. याअगोदर, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये 15 किमीच्या परिघात तपास आणि अटक करण्याचे अधिकार होते, जे आता वाढवून 50 किमी करण्यात आले आहेत. मात्र, पंजाब सरकारने या निर्णयाला विरोध केला आहे. हा 'संघराज्यावर हल्ला' असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, गृह मंत्रालयाने आपल्या पत्रात सीमापार गुन्हेगारी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये पूर्वीप्रमाणेच 50 किमीची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, जम्मू -काश्मीर आणि लडाख वगळता मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर या 5 ईशान्य राज्यांमध्ये कोणतीही सीमा ठरलेली नाही.

सीमा सुरक्षा बल अधिनियम, 1968 च्या कलम 139 नुसार केंद्राला सैन्याच्या अधिकारक्षेत्र वाढवणे किंवा कमी करण्याचे अधिकार आहेत. आवश्यक असल्यास संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर असा आदेश मांडला जाऊ शकतो. सभागृहाने परवानगी दिल्यास सभागृह हे आदेश बदलू किंवा रद्द करू शकते.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. यासोबतच मुख्यमंत्री चन्नी यांनी ट्विट करत केंद्राच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात

"आंतरराष्ट्रीय सीमेवर चालणाऱ्या 50 किमीच्या परिघात बीएसएफला अतिरिक्त अधिकार देण्याच्या भारत सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो. हा संघराज्यावर थेट हल्ला आहे." तर दुसरीकडे, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुजिंदरसिंग रंधावा यांनी देखील केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आणि लोक हे सहन करणार नसल्याचे सांगितले. रंधावा म्हणाले

"आम्ही या निर्णयाचा निषेध करतो. हे संघीय रचनेचे उल्लंघन असून पंजाबमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करेल. लोक हे सहन करणार नाहीत." दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कॅप्टन म्हणाले,

"काश्मीरमध्ये आमचे सैनिक मारले जात आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून पंजाबमध्ये जास्तीत जास्त शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवले जात आहेत. BSF ची वाढलेली उपस्थिती आणि ताकदच आपल्याला आणखी मजबूत बनवेल. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नका." कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

Updated : 2021-10-14T11:36:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top