मुंब्रा पोलिसांची कारवाई: 16 लाखाच्या अमली पदार्थासह दोघे ताब्यात
X
ठाणे : मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरात केलेल्या दोन वेगवेगळ्या अमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये दोन आरोपीना अटक केलेली असून त्यांच्याकडून 210 ग्राम एमडी अमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेली आहे. या एमडीची बाजारात तब्बल 16 लाख एवढी किंमत असल्याची पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी माहिती दिली. 19 नोव्हेंबर रोजी एन.डी.पी.एस पथकातील प्रभारी अधिकारी यांना खबऱ्याने दिलेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुंबा बायपास रोडवर, वाय जंक्शन जवळ,पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे व एन.डी.पी.एस. पथकातील पोलीस स्टाफ बांगर, राजपुत, खैरणार, जाधव यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी गोडविन इमानियल इफेनजी याला बेड्या ठोकल्या. त्याच्या अंगझडतीत 100 ग्राम एमडी पावडर सापडली. तिची किंमत बाजारात प्रति ग्राम 5 हजार 60 रुपये असून सापडलेला साठा हा 5 लाख 6 हजाराचा होता. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणे प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
तर दुसरी अंमली पदार्थाची कारवाई 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोड एक इसम मोफेडीन पावडर विक्री करण्यासाठी येत आहे. अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापाला रचून आरोपी नदीम मेहबुब खान याला जेरबंद केले. त्याच्याकडून 10 लाख रुपयांची 110 ग्राम एमडी पावडर हस्तगत केली. त्याच्या विरोधातही मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात नेले असता त्याला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अटक आरोपी नदीम मेहबुब खान आणि आरोपी गोडविन इमानियल इफेनजी यांनी सदरची एमडी पावडर कोठून आणली आणि मुंब्रा परिसरात कुणाला विकणार होते. याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.






