राणा दाम्पत्य आणखी अडचणीत, आता BMCची नोटीस
X
हनुमान चालीसेच्या वादात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने या दोघांना नोटीस पाठवली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या नोटीशीनंतर आता महापालिकेचे अधिकारी राणा यांच्या घरी जाऊन अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची तपासणी करणार आहेत. ४ मे रोजी म्हणजे बुधवारी महापालिकेचे संबंधित अधिकारी राणा यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहेत आणि त्यासंदर्भात फोटो देखील घेतील, असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.
राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीस म्हणण्याची घोषणा करुन धार्मिक तणाव निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अजून जामीन मिळालेला नाही. आता त्यांच्या जामीन अर्जावर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच आता ४ मे रोजी महापालिकेचे अधिकारी राणा यांच्याकडे तपासणीसाठी जाणार आहेत. दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणा तुरुंगात असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दारावर नोटीस लावली आहे.