Home > News Update > काश्मिरात भाजपाला मिळणार नवा राजकीय मित्र !!!

काश्मिरात भाजपाला मिळणार नवा राजकीय मित्र !!!

काश्मिरात भाजपाला मिळणार नवा राजकीय मित्र !!!
X

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षातून बाहेर पडून काश्मिरात नवा राजकीय पर्याय उभा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा पर्याय म्हणजे एक प्रकारे भाजपासाठी नवा राजकीय मित्र असल्याचा आरोप आतापासूनच होऊ लागला आहे. कॉंग्रेस पक्षाचे बंदीपोरा मधून माजी आमदार उस्मान मजीद यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. उस्मान मजीद जम्मू कश्मीर सरकारातील माजी नियोजन व विकास मंत्रिसुद्धा होते. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि पीडीपीचे संस्थापक सदस्य मुजफ्फर हुसेन बैग आणि त्यांचे सहकारी अल्ताफ बुखारी नव्या राजकीय समीकरणात सामील असतील अशी शक्यता आहे.

जम्मू काश्मीरला अनुच्छेद 370 च्या माध्यमातून लागू असलेली स्वायत्तता केंद्र सरकारने काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी काश्मिरात सुरू झाल्या आहेत. रविवारी उत्तर काश्मिरात एक परिषद आयोजित करून उस्मान मजीद यांनी नव्या राजकीय पर्यायाचे संकेत दिले आहेत. कॉंग्रेसमधील अनेक पदाधिकारी या परिषदेत सहभागी होते, असा मजीद यांचा दावा आहे. त्याशिवाय, कॉंग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षातील समविचारी नेते सोबत असतील, असं मजीद यांनी म्हटलं आहे. केंद्रातील सरकारची ताकद वापरुन भाजपा नव्या राजकीय पर्यायाच्या माध्यमातून प्रस्थापित राजकीय पक्षांचं राजकारण संपवू पाहतेय, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. उस्मान मजीद यांनी कॉंग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांवर चढवलेला हल्ला पुरेसा बोलका आहे, याकडे विश्लेषक लक्ष वेधतात.

काश्मिरात परदेशातून आलेल्या लोकप्रतींनिधींच्या शिष्टमंडळाला उस्मान मजीद कॉंग्रेस पक्षाचा आदेश डावलून भेटले होते. पक्षाने त्यांना त्या संदर्भात नोटिस बजावली आहे. त्यास उस्मान मजीद राजीनाम्याने उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. अलिकडेच आपल्या ट्विटरवरून मजीद यांनी पक्षाचे चिन्ह काढून टाकले होते. तेंव्हाच त्यांची पावले कुठे पडताहेत, हे दिसून आलं होतं. आपल्यावर होत असलेला भाजपाधार्जिणा आरोप त्यांनी खोडून काढला आहे. काश्मिरातील परिस्थितीवर नवा राजकीय पर्याय हाच तोडगा असल्याचं मजीद यांचं म्हणणं आहे. काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा आणि पंचायल निवडणुका ही आपली मागणी असल्याचं मजीद यांनी म्हटलंय.

Updated : 24 Feb 2020 5:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top