...तर अजित पवार यांना रॉयल्टी म्हणून २०० ते ३०० कोटी सहज मिळतील- सोमय्या
X
"अजित पवारांच्या घोटाळ्यावर 'वेबसिरीज' काढली तर रॉयल्टी म्हणून त्यांना २०० ते ३०० कोटी सहज मिळतील" असा शब्दांत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर इन्कम टॅक्सने केलेली ही धाड देशातील सर्वात जास्त दिवस चाललेली धाड असावी असं सोमय्या यांनी म्हटले. ही धाड मागील सात दिवसांपासून सुरू असून यात वेगवेगळ्या 24 कंपन्यांपर्यंत इन्कम टॅक्स पोहचली असल्याचे सोमय्या म्हणाले. या धाडीदरम्यान इन्कम टॅक्सला कुठे भिंतीच्या आड असलेल्या लॉकरमध्ये काही सापडतंय, तर कुठे इमारतीच्या तळमजल्यातल्या सर्व्हररूममध्ये काही सापडतंय असं म्हणताना जर नेटफ्लिक्सने वेबसिरीज बनवायची ठरवली तर सिजन वन, सिजन टू असे अनेक भाग बनवावे लागतील आणि यातून अजित पवार यांना 200 ते 300 कोटींची रॉयल्टी नक्की मिळेल असा टोला सोमय्या यांनी लगावला.
दरम्यान या सर्व घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सल्ला देणाऱ्यांपैकी एक सीए का प्रत्येक घोटाळ्यात दिसून येतो असं सोमय्या म्हणाले. हे ठाकरे पवार सरकार घोटाळेबाजांचे सरकार आहे, या महाराष्ट्राला या घोटाळे बाजांपासून मुक्त करणं हे आमचं लक्ष्य आहे असं किरीट सोमय्या म्हणाले.






