Home > News Update > पदवीधर निवडणूक: पंकजा मुंडे समर्थकाची बंडखोरी, भाजपला दुसरा धक्का

पदवीधर निवडणूक: पंकजा मुंडे समर्थकाची बंडखोरी, भाजपला दुसरा धक्का

bjp faces revolt for mlc election in Aurangabad constituency

पदवीधर निवडणूक: पंकजा मुंडे समर्थकाची बंडखोरी, भाजपला दुसरा धक्का
X

औरंगाबाद: मराठवाड्यात भाजपला धक्यावर-धक्के सुरूच आहे. मंगळवारी सकाळीच भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही तास उलटत नाही तोच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने पक्षाच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बीडच्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळे यांनी माघार न घेता मराठवाडा पदवीधर निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे पदवीधर निवडणुकीत इच्छुकांची बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न करूनही भाजपमध्ये अखेर बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. सकाळीच जयसिंग गायकवाड यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवत, मी भाजपच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. राजीनाम्यानंतर गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याची घोषणाही केली आहे.

गायकवाड यांच्या धक्यानंतर आता पोकळे यांनी भाजपला दुसरा धक्का दिला आहे. रमेश पोकळे यांनी माघार न घेता निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केलीये. आपण गोपीनाथ मुंडे यांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे सांगत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष सोडावा लागेल, कारवाई सुद्धा होईल मात्र मला डावलले म्हणून मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास पोकळे यांनी व्यक्त केला.

आधी एकनाथ खडसे, त्यांनतर जयसिंग गायकवाड आणि आता पोकळे यांनी भाजपच्या विरोधात थेट भूमिका घेतल्याने भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेते जयंत पाटील यांनी भाजपला लवकरच गळती लागणार असल्याचा इशारा दिला होता.

Updated : 17 Nov 2020 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top