Home > Election 2020 > शिवसेनेसोबतच्या युतीवर ठरणार उल्हासनगरचा भाजप उमेदवार...  

शिवसेनेसोबतच्या युतीवर ठरणार उल्हासनगरचा भाजप उमेदवार...  

शिवसेनेसोबतच्या युतीवर ठरणार उल्हासनगरचा भाजप उमेदवार...  
X

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हातात ठेवला आहे. ३० सप्टेंबरला याबाबत ते अंतिम निर्णय घेतील आणि तो निर्णय शिवसेना-भाजपच्या युतीच्या भवितव्यावर अवलंबून असेल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. शिवसेना-भाजपा युती झाली तर कुमार आयलानी आणि नाही झाली तर पंचम कालानी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. ज्योती कालानी उल्हासनगरच्या आमदार आहेत, परंतु महानगरपालिकेत त्यांच्या मुलाने ओमी कालानीने आपला स्वतंत्र गट बनवून भाजपबरोबर सत्तेत सहभाग नोंदवला आहे. ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी उल्हासनगर शहराच्या महापौर आहेत. ओमी कालानी यांनी आता उल्हासनगरच्या आमदारकीवर सुध्दा दावा ठोकल्याने भाजपाच्या गोटात नाराजी पसरली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांची पत्नी मीना आयलानी यांना अर्ध्यावरच महापौरपदाचा राजीनामा द्यायला लावून पंचम कालानी यांच्याकडे महापौर पद सोपवण्यात आलं आहे. त्यावेळी कुमार आयलानी यांना आमदारकीचं आश्वासन दिलं गेलं होतं. पण आता ऐनवेळी ओमी कालानी यांनी आयलानी यांची कोंडी केली आहे आणि तिकीटाची शक्यता ५०-५० टक्क्यावर आणून ठेवली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले राजकीय डाव खेळत महापौर पंचम कालानी यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान बांधत दोन दगडांवर पाय ठेवणं चालणार नाही, असं स्पष्ट बजावलं. त्याचाच परिणाम म्हणून ज्योती कालानी यांनी निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नकार कळवला असल्याचं भाजपा गोटात बोललं जातं असलं तरी कालानी गोटातून याचा इन्कार करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर, आपलं तिकीट निश्चित असल्याचं कालानी गोटातून शहरात पसरवण्यात आलंय. पण भाजपातील सूत्रं मात्र ती अफवा असल्याचं सांगत, निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात असून ३० सप्टेंबरला तो घोषित होईल, असं सांगत आहेत.

Updated : 23 Sep 2019 3:32 PM GMT
Next Story
Share it
Top