Home > News Update > आघाडीच्या बेपर्वाईमुळे राज्याचे नुकसान, भाजपचा घणाघात

आघाडीच्या बेपर्वाईमुळे राज्याचे नुकसान, भाजपचा घणाघात

केंद्र आणि राज्य वाद चांगलाच रंगला आहे. त्यातच राज्याचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यावरून केंद्र सरकारच्या नावाने कायम बोटं मोडणारे ठाकरे सरकार केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीला अनुपस्थित राहुन केंद्र सरकारने दिलेला सहकार्याचा हात झिडकारत आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होत असल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली.

आघाडीच्या बेपर्वाईमुळे राज्याचे नुकसान, भाजपचा घणाघात
X

फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बैठक आयोजित केली होती. तर कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. त्या दोन्ही बैठकीला राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री अनुपस्थित राहिले. त्यावरून महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी राज्याच्या योजना व आर्थिक गरजा मांडण्याची संधी गमावली, असा आरोप उपाध्ये यांनी केला. तर केंद्र सरकारने दिलेला किती निधी राज्य सरकारने खर्च केला याचा हिशोब राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमीवर 30 डिसेंबर रोजी राज्याच्या अर्थमंत्र्यांची बैठक बोलवली होती. मात्र अजित पवार यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता केंद्रीय तिजोरीतून अपेक्षित असलेल्या आर्थिक तरतुदींचा तपशील केंद्रापर्यंत पोहचू शकला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात राज्याचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले, राज्य सरकार आर्थिक आणि आरोग्याच्या स्थितीबाबत प्रचंड ढिसाळपणा दाखवत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. तर राज्यातील रुग्णालयांची सज्जता, ऑक्सिजन पुरवठा, उपचाराची साधने, आर्थिक गरजा याबाबत केंद्र सरकारने पुर्ण सहकार्य केले आहे. मात्र केंद्र सरकारने दिलेल्य़ा निधीपैकी फक्त 7 टक्के निधीच राज्य सरकारने वापरला आहे. तर उरलेला निधी तसाच पडून आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ढिसाळपणामुळे आरोग्याच्या समस्या टांगणीला लागलेल्या आहेत, असा आरोप उपाध्ये यांन केला.

Updated : 8 Jan 2022 3:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top