भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ! वैद्यनाथ सहकारी कारखान्याला बँकेची नोटीस
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर 203 कोटीच्या थकबाकीची युनिअन बँकेने सुरु केली कारवाई...!
X
भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्या मागचा वसुलीदारांचा ससेमिरा कमी होण्याचे नाव घेत नाही. अगोदरच जीएसटीच्या थकबाकीसाठी वैद्यनाथ कारखान्यावर आर आर सीची कारवाई सुरु असतानाच आता युनिअन बँकेने कारखान्याकडे तब्बल 203 कोटींच्या थकबाकीसाठी थेट कारखान्याच्या लिलावाची सुरु केली आहे. त्यासाठीची जाहिरात करण्यात आली असून 25 जानेवारी रोजी हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार आहे
लिलावाच्या नोटीस मध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि, आश्रबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख,ज्ञानोबा मुंडे,फुलचंद कराड, गणपराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी,किसनराव शिनगारे,महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडूरंगराव फड,पंजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर.
टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे पाटील, वेंकटराव कराड, यशश्री मुंडे यांचा लिलाव नोटीसीत कर्जदार, जामिनदार व तारणदार म्हणून उल्लेख आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 19 कोटी रुपयांच्या थकीत जीएसटी प्रकरकरणी या विभागानेही कारखान्यावर कारवाईची प्रक्रीया सुरु केली होती. याचे राजकीय पडसाद देखील उमटले होते. समर्थकांनी त्यांच्यासाठी मदत देऊ केली होती. मात्र, पैसे नको, आशिर्वाद द्या, म्हणत मुंडेंनी मदत नाकारली होती. त्याचकाळात बँकेने कारखान्याकडे थकीत कर्जासाठी कारवाईसाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील प्रक्रिया सुरु केली होती. बँकेने जप्तीच्या याचिका दाखल केली होती. मात्र सदरचे प्रकरण
वेगळ्या न्यायिक खंडपीठासमोर सुरू झाल्याबद्दल सांगत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेची याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता बँकेने थेट कारखान्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार विकास निगम लिमिटेड मार्फत राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांना मार्जीन लोन दिले. यात काँग्रेस नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. मात्र, वैद्यनाथचा या लोनसाठी प्रस्ताव असूनही लोन मिळालेले नाही. याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता या संकटातून पंकजा मुंडे कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.