Home > News Update > केईएम रुग्णालयाच्या स्वायत्त संस्थेत भ्रष्टाचार, एफ. आय. आर. दाखल

केईएम रुग्णालयाच्या स्वायत्त संस्थेत भ्रष्टाचार, एफ. आय. आर. दाखल

केईएम रुग्णालयाच्या स्वायत्त संस्थेत भ्रष्टाचार, एफ. आय. आर. दाखल
X

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील केईएम रुग्णालयास ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सन १९९१ च्या सुमारास तत्कालीन प्राध्यापक - शिक्षक व माजी विद्यार्थी मंडळींच्या पुढाकाराने 'डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट' या नावाने एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

या स्वायत्त संस्थेद्वारे प्रामुख्याने वैद्यकीय संशोधन व अनुषंगिक सहकार्य करण्याचे कार्य केले जाते. तसेच सदर संस्था पूर्णपणे स्वायत्त असून ती बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा केईएम रुग्णालयाच्या अखत्यारित नाही. या स्वायत्त संस्थेच्या निधीमध्ये संस्थेचे कंत्राटी कर्मचारी असणाऱ्यांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले असून या अनुषंगाने एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे मानद अध्यक्ष व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

या स्वायत्त संस्थेच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना डॉक्टर देशमुख यांनी सांगितले की, 'डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट' च्या विश्वस्त मंडळावरील सर्व व्यक्ती या मानद 'विश्वस्त' असून त्या स्वयंसेवी पद्धतीने या संस्थेचे काम बघतात. मात्र, या संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी काही कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर संस्थेमध्ये कार्यरत आहेत.

या स्वायत्त संस्थेच्या अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्वायत्त संस्थेच्या कामांसाठी महापालिकेचा किंवा केईएम रुग्णालयाच्या कोणताही निधी उपयोगात आणला जात नसून संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांमधून या संस्थेचे कामकाज चालते. सबब, आर्थिकदृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या 'डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट' ही पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे.

या संस्थेत काम करणारे एक लेखापाल व एक लिपिक यांनी गेल्या काही वर्षात खोटी कागदपत्रे तयार करून सदर स्वायत्त संस्थेचा निधी अन्यत्र वळविला. या अनुषंगाने सदर संस्थेचे मानद अध्यक्ष तथा केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये संबंधित लेखापाल श्रीपाद देसाई व लिपिक राजन रावूळ यांच्या विरोधात रितसर 'एफ.आय. आर.' तक्रार दाखल केली आहे.

सदर दोन्ही कर्मचाऱ्यांना ट्रस्टच्या कामातून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या स्तरावर योग्य ती चौकशी व तपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या साधारणपणे बारा वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या अपहारामुळे संस्थेच्या संशोधकीय कामांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिला आहे.

Updated : 23 May 2021 4:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top