Home > News Update > भीमा कोरेगाव प्रकरण : जामीन अर्जावरील सुनावणी आधीच स्टॅन स्वामी यांचे निधन

भीमा कोरेगाव प्रकरण : जामीन अर्जावरील सुनावणी आधीच स्टॅन स्वामी यांचे निधन

भीमा कोरेगाव प्रकरण :  जामीन अर्जावरील सुनावणी आधीच स्टॅन स्वामी यांचे निधन
X

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी NIA ने अटक केलेल्या स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांना महिनाभरापूर्वी तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण सोमवारी दुपारी दीड वाजता स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांचे निधन झाले. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दुपारी अडीच वाजता होती, पण त्यांच्या वकिलांनी कोर्टाला स्वामी यांचे तासाभरापूर्वी निधन झाल्याची माहिती दिली. गेल्या ८ महिन्यांपासून तळोजा तुरुंगात असलेल्या स्टॅन स्वामी यांची प्रकृती सातत्य़ाने खालावत होती. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलाने कोर्टाला स्वामी यांच्या प्रकृतीची माहिती दिल्यानंतर कोर्टाने स्वामी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले होते. स्टॅन स्वामी यांना रविवारी पहाटे साडे वाजता ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर दुपारी त्यांचे निधन झाले.

आदिवासींच्या हक्कांसाठी काम करणारे स्टॅन स्वामी एल्गार परिषद प्रकरणी NIA ने अटक केलेले शेवटचे कार्यकर्ते होते . त्यांना UAPA कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. पण तुरुंगात प्रकृती बिघडल्यानंतर २८ मे रोजी कोर्टाने त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याचे आदेश दिले होते. स्वामी यांनी जामिनाची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे आदेश दिले होते.

कोण होते स्टॅन स्वामी?

स्टॅन स्वामी यांनी बगीचा नावाची संस्था स्थापन केली होती. आदिवासींचे हक्क आणि अल्पवयीन मुलांना माओवादी म्हणून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याच्या कारवाईविरोधात ते या संस्थेच्या माध्यमातून काम करत होते. स्वामी हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित होते, असा आरोप NIA केला होता.

दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वामी यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांना न्याय आणि मानवतेची वागणूक मिळायला हवी होती, असे म्हटले आहे.

Updated : 5 July 2021 3:55 PM IST
Next Story
Share it
Top