Home > News Update > बेळगाव: हलगा मच्छे बायपास आंदोलन चिघळले, तरुणाचा जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

बेळगाव: हलगा मच्छे बायपास आंदोलन चिघळले, तरुणाचा जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

बेळगाव: हलगा मच्छे बायपास आंदोलन चिघळले, तरुणाचा जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
X

बेळगाव शहराच्या बाहेरून राष्ट्रीय महामार्ग क्र 4 ते बेळगाव गोवा महामार्गाला जोडणारा हलगा मच्छे बायपास मार्गाच्या कामासाठी शेतकरी विरोधात असताना देखील प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करून जबरदस्तीने रस्त्याच्या कामाला सुरवात केली आहे.

सुपर 9.5 किमी लांबीच्या या बायपास साठी सुमारे 135 एकर जमीन घेतली जाणार असून ही सर्व जमीन शेतीसाठी उपयुक्त असून तिबार पेरणी या ठिकाणी केली जाते. आपली सुपीक जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील प्रशासनाने पोलीस दबावतंत्राचा वापर करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी शेतकऱ्यांसह महिलांनीदेखील आंदोलनात सहभागी होत काम बंद करण्यासाठी शेतात ठिय्या केला. पण पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत आंदोलकांना हटविण्यासाठी पराकाष्ठा केली आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी हातात विळे घेऊन काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. पण पोलिसांनी त्यांच्या हातातली विळे घेऊन त्यांना जबरदस्तीने बंदिस्त केले आहे.

एका शेतकऱ्याने झाडावर चढून उडी मारण्याचा इशारा दिला. आपली सुपीक जमीन जाणार या आक्रोशाने आकाश अनगोळकर या युवकाने स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी व आंदोलन स्थळी असलेल्या उपस्थितांनी त्याची आग विझवून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याला वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

40 टक्के भाजल्यामुळे आकाशची परिस्थिती चिंताजनक आहे. आंदोलन करणाऱ्यांमध्ये एक महिला आपल्या 8 महिन्याच्या तान्हुल्यासह विरोध करण्यासाठी समोर आली असता पोलिसांनी दमदाटी करत तिला हुसकावून लावले.

प्रशासन शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेऊन विकासाच्या नावावर शेतकऱ्यांना उध्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक शेतकऱ्यांना बंदिस्त केले असून प्रशासनाने उभ्या पिकातून बुलडोझर फिरवला आहे. आंदोलन स्थळावरील आक्रोश हृदय पिळवटणारा असून हलगा मच्छे बायपास आंदोलन अधिकच चिघळताना दिसत आहे.

न्यायालयाचा स्थगितीचा आदेश असून झिरो पॉईंट न दाखवताच प्रशासनाने कामाला सुरवात केली आहे. या बायपाससाठी शेतकऱ्यांनी प्रस्तावित मार्ग देखील सुचविला असून प्रशासनाने शेतकऱ्यांचं न ऐकता सुपीक जमिनीतूनच रस्ता करण्याचा हट्ट चालवला आहे.

यासाठी बेळगाव भागातील जनता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. या सगळ्यात विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकारी या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत. सीमाभागातील या भागात असणाऱ्या बहुतांश मराठी शेतकऱ्यांच्या या जमिनी असून मराठी माणसाला उद्ध्वस्थ करण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा सुरु असल्याचा आरोप मराठी माणसांनी केला आहे.

Updated : 11 Nov 2021 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top