Home > News Update > औरंगाबादचे नामांतर होणार का? राजेश टोपे यांनी स्पष्ट केला सरकारचा अजेंडा

औरंगाबादचे नामांतर होणार का? राजेश टोपे यांनी स्पष्ट केला सरकारचा अजेंडा

औरंगाबादचे नामांतर होणार का? राजेश टोपे यांनी स्पष्ट केला सरकारचा अजेंडा
X

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराचा वाद रंगलेला आहे. त्यातच औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाजप आणि मनसे आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर औरंगाबादच्या नामांतराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाविकास आघाडीचा अजेंडा स्पष्ट केला आहे.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यावरून शिवसेना भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. तर मनसेनेही औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुध्दा औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. त्यामुळे यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडीची नाव बदलण्याबाबत भुमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर म्हणू देत किंवा अजून काही. पण औरंगाबादचे नाव बदलण्याचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर नाही. मात्र प्रत्येक पक्षाचे अजेंडे असतात. त्यामुळे त्यानुसार ते पक्ष काम करतात. मात्र औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा विषय हा महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, लोक गरजेनुसार आणि सोयीप्रमाणे संभाजीनगर असा उल्लेख करतात. मात्र मला असं वाटत नाही की, लगेच हा विषय अजेंड्यावरचा आहे. कारण राज्यात पाणी, रस्ते, वीज यांचे प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवे.

भाजपकडून नाव बदलण्याची मागणी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलताना मी औरंगाबादला संभाजीनगर म्हणतो. मग नाव बदलण्याची गरज काय असे वक्तव्य केले होते. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार संभाजीनगर असं नाव करणार नाही. त्यावरून चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली. तसेच राज ठाकरे यांनीही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती.

सुभाष देसाई दिल्लीत

औरंगाबाद मधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे यासाठी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र यापार्श्वभुमीवर राजेश टोपे यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated : 18 May 2022 3:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top