आश्रम शाळेत मुलींना विषबाधा, लैंगिक शोषणाची शंका ?

530

बुलढाणा जिल्ह्यातील चिंचाळा येथील आदिवासी आश्रम शाळेतील 12 मुलींना पोटात वेदना होत असल्याने मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. यापैकी चार मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मेहकर तालुक्यातील चिंचाळा येथील जिजामाता आदिवासी निवासी आश्रम शाळेत शनिवारी तीन मुलींच्या पोटात वेदना होत असल्याने त्यांना डोणगाव येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यापाठोपाठ दोन दिवसांमध्ये बारा मुलींना अशाच वेदना होत असल्याने मुलींना मेहकर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केलाय. मात्र, आश्रम शाळेत मुलं आणि मुली दोन्ही असून मुलींनाच अशा पद्धतीच्या पोटात वेदना होत असल्याने लैंगिक अत्याचाराच्या संशयाची चलबीचल सुरु झाली आहे. यासंदर्भातला अधिक तपास डोनगाव येथील पोलिस करत आहेत.

पहिली ते बारावी पर्यंत वर्ग असलेल्या या आदिवासी आश्रम शाळेमध्ये एकूण ४२६ मुलं, मुली पटावर असून १२७ मुली वस्तीगृह मध्ये राहतात तर २२७ मुलं देखील आहेत  ४२ विद्यार्थी हे अनिवासी असून १००% अनुदानित असलेल्या या शाळेमध्ये एकूण ३४ कर्मचारी कार्यरत असून, वस्तीगृहासाठी तीन शिक्षिका आणि एक अधीक्षिका नेमलेले आहेत. मात्र, ही घटना घडल्याच्या दिवशी महिला कर्मचारी रजेवर गेलेल्या असल्याने त्यांच्या जागेवर दुसऱ्या कर्मचारीला पदभार दिलेल्या शिक्षिकाही उपस्थित नव्हत्या.

मेहकर येथील खाजगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना आणलं असता त्यांच्यासोबत वस्तीगृहातील किंवा शाळेतील कर्मचारी उशिरा आल्याने पालकांमध्ये रोष पाहायला मिळाला. काही दिवसापुर्वीच ही संस्था शंकरराव बोरुडे यांनी संतोष मापारी यांना हस्तांतरीत केल्याची माहिती मिळाली. “त्यांच्याच आदेशावरून विद्यार्थ्यांच्या भोजनामध्ये काटकसर केली जात असून, इतर सुविधाही मिळत नसल्याचं कॅमेरा पुढे न येण्याच्या अटीवर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलं.”

आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अंथरूण-पांघरूण पुरेसं मिळत नसल्यानं थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचंही निदर्शनास आलं आहे. विद्यार्थी जमिनीवर झोपत असून इतर सुविधांचा देखील मोठ्या प्रमाणावर अभाव शाळेमध्ये दिसून आला. अध्यक्षांच कर्मचारी विरुद्ध षड्यंत्र असून कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, या उद्देशाने हा प्रकार झाला असावा असं समजतय. सदर प्रकार प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना दूरध्वनीद्वारे कळविले असता त्यांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.