अशोक आंबेकर यांचं निधन
X
'आम्ही आनंदी कट्टयावरचा हिरो' गमावला - ज्येष्ठ नागरिक
मुंबई – चेंबूर इथल्या ज्येष्ठ नागरिक आनंदी कट्ट्याचे अग्रणी अशोक लक्ष्मण आंबेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. चेंबूरच्या साई रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (दि. ५ ऑगस्ट रोजी) रात्री ११ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
श्री. आंबेकर यांच्या पश्चात पत्नी संगीता, मुलं मॅक्स महाराष्ट्रचे संचालक रवींद्र आंबेकर , सामाजिक कार्यकर्ते संतोष आंबेकर आणि मुलगी रेश्मा आंबेकर-बुगडे आणि नातवंडं असा परिवार आहे. श्री. आंबेकर हे खादी ग्रामोद्योग मध्ये नोकरीला होते. सेवा कालावधीत त्यांनी स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून स्थानिक तरूणांना नोकरी मिळण्यासाठी अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. खादी ग्रामोद्योगमधील घोटाळे लपविण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीविरोधातही श्री. आंबेकर यांनी लढा उभारला होता. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवलं होतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदी कट्टा’ उभारणीतही ते अग्रेसर होते.
श्री. आंबेकर यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार, दि. ६ ऑगस्ट) चेंबूर इथल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील नामंकित आणि आनंदी कट्ट्याचे सदस्य आणि राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी शोकाकूल वातावरणात उपस्थितांनी श्री. आंबेकर यांना आदरांजली वाहिली.
आनंदी कट्ट्यावरच्या अशोक आंबेकरांच्या मित्रांनी आदरांजली व्यक्त करतांना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.आमचा 'आनंदी कट्टयावरचा हिरो' दिलदार मित्र, सामाजिक तळमळ असलेला सहृदय माणूस काळाने आमच्यापासून हिरावून नेला. अशा या माणसाने आमचे भावविश्व समृद्ध केले अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.