Home > News Update > समीर वानखडेंना सत्र न्यायालयाचा झटका

समीर वानखडेंना सत्र न्यायालयाचा झटका

समीर वानखडेंना सत्र न्यायालयाचा झटका
X

सध्या अडचणीत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडेंना एकापाठोपाठ एक दणका बसत आहे. एससीबीकडून त्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरु झाल्यानंतर त्यांनी एनडीपीएस विशेष न्यायालयात दाखल केलेली याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे.

उद्या मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीनावर सुनावणी होणार असतानाच प्रभाकर साईल याचं प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. त्यातून त्यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी आज सकाळीच कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोर्टाबाहेर होत असलेले आरोप, उघड केली जात असलेली पंच, साक्षीदारांची नावं यास वानखेडे यांनी हरकत घेतली आहे.

घडलेला गुन्हा आणि त्याविषयीच्या पुराव्यांबाबत कोर्टाबाहेर सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळं तपास आणि खटल्यावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा प्रतिज्ञापत्रात व्यक्त करण्यात आली आहे. 'तपासात खोडा घालण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. समीर खान नामक एका व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून एक राजकीय नेता मला सातत्यानं लक्ष्य करत आहे. माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली जात आहे. न्यायालयानं याची दखल घ्यावी,' अशी विनंती समीर वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्रातून केली होती.

पंचाचे प्रतिज्ञापत्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यामुळे आर्यन खान प्रकरणातील चौकशीला अडथळा निर्माण होईल. तसेच उद्या उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीनावर होणाऱ्या सुनावणीवर देखील प्रभाव पडेल. त्यामुळे प्रभाकर साईल याला साक्षी पुराव्यांमधे फेरफार करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी एनसीबीचे वकिल अद्वैत सेठाना यांनी कोर्टात केली होती

एनडीपीएस विशेष न्यायालयात (मुंबईचे सत्र न्यायालय, एनडीपीएस विशेष न्यायालय) विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी असा आदेश हे कोर्ट देऊ शकत नसल्याचे सांगत एनसीबीचा अर्ज फेटाळून लावला आहे. विशिष्ट टप्प्यावर संबधीत न्यायालय किंवा न्यायाधीकरण यासंबधीचा आदेश जारी करु शकते असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

विशेष म्हणजे काल एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडेंवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्र लिहून कारवाई न करण्याची मागणी केली होती. उद्या मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खान प्रकरणी जामीन याचिकेवर सुनावणी होणार असल्यानं या कोर्टाला आता टप्प्यावर आदेश देता येणार नाही. एनसीबीनं संबधीत न्यायालयात अर्ज करावा असा सल्ला देत कोर्टानं एनसीबीची मागणी फेटाळून लावली आहे. दरम्यान प्रभाकर साईल याचं प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओनंतर एनसीबी महासंचालकांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीकडून समीर वानखडेंची खात्याअंतर्गत चौकशी सुरु झाली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप करणारा किरण गोसावी याचा बॉडिगार्ड आणि पंच प्रभाकर सईल मुंबई पोलिस मुख्यालयात हजर झाला आहे. तसंच, त्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजतेय. तसंच, खंडणीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. प्रभाकर याला मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे.प्रभाकर साईल याला सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्याचा जबाब घेतला जात आहे. तसंच, गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Updated : 25 Oct 2021 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top