Home > News Update > मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी भाजप खेळत असल्याचा आरोप करत मंत्र्याचा राजीनामा

मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी भाजप खेळत असल्याचा आरोप करत मंत्र्याचा राजीनामा

मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी भाजप खेळत असल्याचा आरोप करत मंत्र्याचा राजीनामा
X

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याने धक्का बसलेल्या योगी आदित्यनाथ यांना सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उ. प्रदेशातील भाजपा सरकारमधील आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. वन-पशु-फलोत्पादन मंत्री म्हणून काम केल्यानंतर दारा सिंह चौहान यांनी राज्यपालांना आपला राजीनामा पाठवला आहे. आपण आपल्या विभागाच्या कल्याणासाठी मनापासून काम केले, पण योगी सरकारने दलित, इतर मागासवर्गीय, शेतकरी आणि बेरोजगार तरुणींची उपेक्षा केल्याने आपण नाराज आहोत, तसेच मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या खेळामुळे आपण उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान या नेत्यांच्या राजीनाम्यानंतर उ. प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आवाहन केले आहे. " कुटुंबातील एखादा सदस्य भरकटला तर दु:ख होते. सर्व आदरणीय नेत्यांना माझे आवाहन आहे की, बुडत्या नावेत तुम्ही बसू नका, नुकसान तुमचेच होणार आहे. मोऑ बंधू दारा सिंह यांनी आपल्या निर्णय़ावर पुनर्विचार करावा" असे आवाहन त्यांनी केले आहे.

दारा सिंह चौहान आणि स्वामी प्रसाद मौर्य यांनी बसपामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दारा सिह चौहान हे ओबीसी नेते आहेत, त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वक्त होते आहे. दारा सिंह हे मधुबन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान भाजपला उ. प्रदेशात आणखी धक्के बसले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपच्या काही माजी मंत्र्यासोबतचे फोटो ट्विट करत त्यांचे पक्षात स्वागत असल्याचे म्हटले आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार ब्रिजेश कुमार प्रजापती, आमदार रोशन लाल वर्मा आणि आमदार भगवती सागर यांनीही भाजपाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे.

Updated : 12 Jan 2022 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top