Home > News Update > अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपणार, जामीन मिळणार का?

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपणार, जामीन मिळणार का?

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपणार, जामीन मिळणार का?
X

मुंबई // राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे त्यांना पुन्हा ईडी कोठडीत जावं लागलं होतं. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांनी 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडी कोठडी 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्याची आज मुदत संपणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आज जामीन मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

12 नोव्हेंबरला अनिल देशमुख यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टात युक्तिवाद केला. देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केल्याची माहिती आहे. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली. त्या कोठडीची मुदत आज संपणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर निलंबित एपीआय वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

अनिल देशमुख सध्या ईडी कोठडीत असून ईडीनंतर सीबीआय देखील अनिल देशमुखांवर कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

Updated : 15 Nov 2021 2:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top