Home > News Update > परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार: अनिल देशमुख

परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार: अनिल देशमुख

परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांचं प्रसिद्धी पत्र, काय म्हटलंय पत्रात?

परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार: अनिल देशमुख
X



मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक प्रसिद्धपत्रक जारी केलं असून आपली बाजू मांडली आहे. ते म्हणतात…



मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.


- सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?


- आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून श् परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना श्परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?


- 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.


- पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.


- परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.


- स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.


- सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?


- विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.


-स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे


- मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.


असं अनिल देशमुख यानी पत्रात म्हटलं आहे.



काय आहे पत्र?



सचिन वाझे प्रकरणात राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिस आयुक्त पदी असणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या बदल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात अनेक थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Prambir Singh) यांना हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.


दरम्यान परमबीर सिंग यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..



मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असतानापरमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.

अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी केली आहे.



सचिन वाझे प्रकरण नक्की काय आहे?


25 फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.


त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.


विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.


त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी एटीएसकडे देण्यात आली. मात्र, अंबानीच्या घराबाहेरील स्फोटकांच्या चौकशीचे प्रकरण एटीएसकडे असताना एनआयएने हे प्रकरण स्वत:कडे घेतले. त्यानंतर त्यांनी सचिन वाझेची चौकशी केली. या चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली. वाझे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने वाझे यांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाझेंना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान वाझे यांनी मोठे खुलासे केले असल्याचं एनआयए ने म्हटलं आहे.


Updated : 20 March 2021 5:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top