Home > News Update > अमरावतीत संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधीक्षकांना घेराव

अमरावतीत संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधीक्षकांना घेराव

गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना तातडीने मिळावा या मागणीसाठी अमरावतीत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दारुच्या बारवर बसून विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अमरावतीत संतप्त शेतकऱ्यांचा कृषी अधीक्षकांना घेराव
X

अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी शेतकऱ्यांनी हजार रुपये भरून कापूस आणि सोयाबीन पिकांचा विमा उतरवला होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं मात्र, अमरावती जिल्ह्यात अद्यापही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना गेल्या वर्षीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी अमरावती येथील जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तासांपासून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाला घेराव घातला. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी कार्यालय न सोडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांनी दिला होता. सोबतच शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाही तर वेळप्रसंगी आत्महत्या करू असाही इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना संतप्त शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर, अचलपूर, चांदुर बाजार इथल्या शेतकऱ्यांना विमा मिळतो मात्र, अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळत नाही हा आमच्या तालुक्यावर अन्याय आहे. अंजनगाव तालुक्याला कोणी वाली नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

सोबतच विमा कंपनीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक देखील नाही अशा शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाते असा आरोप केला आहे. असे अधिकारी शेतात येऊन पंचनामे न करता दारूच्या बारवरच पंचनामे करत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकाराची सरकारने तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Updated : 27 July 2021 6:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top