मांजरा धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडले; नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान
X
लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने काल मंगळवारी (दि. २८) रोजी धरणाचे सर्व १८ दरवाजे सव्वा ते तीन मीटरने उघडून धरणातून ७० हजार ८४५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या ४२ वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. १४५ किलोमीटर मांजरा नदीपात्र दुथडी भरून वाहत असून मांजरा नदीला महापूर आला आहे. मोठ्या प्रमाणात नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील पिके पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लातूर शहराला मांजरा धरणातूनच पाणी पुरवठा केला जातो. सोबतच लातूर एमआयडीसी, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही गावांना देखील याच धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात याआधी फारसा पाऊस पडत नसल्याने सातत्याने या भागांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पण तीन चार वर्षाच्या अंतराने मांजरा धरण भरत आहे. यंदा देखील हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी नदीला महापूर आल्याने , शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.