Home > News Update > अजित पवारांचा समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठिंबा

अजित पवारांचा समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठिंबा

देशात सध्या समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या हालचाली केंद्र सरकार कडून सुरु आहेत. यासाठी केंद्रात मोदी सरकारने पाऊलं उचलायला सुरवात केली आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्र सरकार असा कायदा आणत असेल तर माझा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय

अजित पवारांचा समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठिंबा
X

लोकसंख्या नियंत्रणासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी कायदा आणावा, दोन अपत्य असायला हवीत अशी भूमिकाही अजित पवार यांनी स्पष्ट केली.

समान नागरी कायदा करतांना जो वंचित आहे, दुर्लक्षित आहे त्याला सोबत आणायला हवं. सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. अजित पवार जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय विभागाचा राज्यस्तरीय अधिवेशनासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर प्रचंड खर्च केला जातोय. पण या योजना खरंच लोकांपर्यंत पोहचत आहेत का असा सवाल यावेळी पवार यांनी केलाय. आज निव्वळ राजकारण चाललं आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईड ट्रॅक केलं जातंय हे सर्व शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून घडतंय.

राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जाती-धर्मात तणाव निर्माण होतोय, यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. गेल्या दोन-तीन महिन्यात दंगलीच्या दहा ते बारा घटना घडल्या. महाराष्ट्र पुरोगामी विचारधारेचा आहे. वर्षानुवर्षे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. शांतता राखण्याचं काम सरकारचं आहे. मात्र, सरकार ते करताना दिसत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केलीय.

सत्ताधाऱ्याचं महागाई, शेती मालाला भाव नाही, यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का ? असा आरोपही पवार यांनी केला. सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये राज्याचे काम काम सुरू आहे. तीन तीन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद एका मंत्र्याकडे आहे. काम लोकांची कशी होतील. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे, त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शेजारच्या राज्यांमध्ये शेती मालाला चांगला भाव आहे. आपल्याकडे भाव मात्र कमी आहे. सरकार मात्र शेती मालाच्या विषयी बघायला तयार नाही. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात समन्वय सरकारने साधायला हवा, खतांच्या किंमती वाढवल्या जात आहेत, साठेबाजी सुरू आहे, बोगस बियाणे विक्री सुरू आहे. कृषी विभाग कारवाईचा आव आणतो, मंत्र्यांचे पीए अडकले बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आमच्या सरकारमध्ये असं कधीही महाराष्ट्रात घडलं नाही.

सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट, मग ती नियमात असेल किंवा नाही काही बघितलं जात नाही असा कारभार सुरु आहे. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. मात्र, जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे. बेरोजगारी वाढत आहे, कारखानदारी मोडीत निघाली आहे. गुंतवणूक करणारे उद्योग निघून गेले, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.

पावसाने ओढ दिली आहे, सरकारने मात्र लोकांना मदत केली नाही. शेतीमालाला अनुदान दिलं नाही. कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना वीज नीट मिळत नाही. रात्रीही आणि दिवसा पण वीज दिली जात नाही. ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही. मुंबईत महिलेवर अतिप्रसंग झाला, अशा अनेक घटना वाढल्या आहेत पोलिसांचा, सरकारचा दरारा आणि दबदबा राहिलेला नाही. पोलीस खात्यात नको तेवढा राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे

शिंदे गट आणि भाजप सुरुवातीला सत्तेसाठी एकत्र आले. भाजपला काहीही करून सत्ता हवी होती. आता मात्र यांच्यात वाद उफाळून आले आहेत. जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. जाहिरातबाजीवर खर्च कसा केला, कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठून आला हे सरकारने जाहीर करावं. ज्यांची नावे घेऊन सरकार स्थापन केलं त्यांनाही हे विसरून गेले. ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांचे फोटो जाहिरातबाजीत आहेत हे गंभीर आहे, अशी टीका पवार यांनी केली.

Updated : 16 Jun 2023 9:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top