Home > Max Political > आयकर विभागाच्या धाडी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आयकर विभागाच्या धाडी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

आयकर विभागाच्या धाडी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर गुरूवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यामध्ये आपल्या दोन बहिणींच्या घरीही धाडी टाकण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पण केवळ त्या आपल्या बहिणी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई का केली गेली, राज्याचे राजकारण एवढ्या खालच्या थराला का गेले आहे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर शुगर कारखान्यांवर छापेमारी झाल्यानंतर हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगण्यात येत आहेत. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.

आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरमधे एकाचवेळी धाडी टाकल्याचे वृत्त असून सत्ताधारी पक्षाच्या जवळील उद्योजक, कारखान्यांचे संचालक आणि राजकारण्यांच्या निकटवर्तींचा धाडीमधे समावेश आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याचे सांगितले जात आहे.

छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे, आपण कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही. आपल्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर काही बोलणार नाही पण अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेलने विचार केला पाहिजे की राजकारण कुठल्या स्तरावर गेले आहे, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 7 Oct 2021 8:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top