Home > News Update > शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा
X

अहमदनगर// केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या तीनही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी मागील दीड वर्षांपासून शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, आज तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांसह विविध राजकीय आणि कामगार पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसने पाठिंबा दर्शवली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या संदर्भामध्ये राज्यस्तरावर देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्या यांच्या वतीने पुकारलेल्या आजच्या भारत बंदला विधिमंडळ पक्षाचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दिलेला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देखील या बंदला आता पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेत त्यांना बरबाद करण्याचा अजेंडा राबवण्याची पद्धती अवलंबली आहे. देशातील सार्वजनिक उपक्रम असणारे बँक, रेल्वे, विमानसेवा ह्या विकण्याचा सपाटा लावला असून एक प्रकारे देश विकायला काढला आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये या सर्व उपक्रमामुळे देशामध्ये रोजगार निर्मिती करत सरकारला अधिक सक्षम करण्याचे काम काँग्रेस केले होते. मात्र भाजपने स्वतः काही निर्माण तर केले नाहीच परंतु काँग्रेसने निर्माण केलेले व देशाच्या विकासामध्ये उत्तम योगदान दिलेले उपक्रम विक्रीस काढल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे दुर्दैवाने पहावे लागत आहे.

दुसरीकडे देशामध्ये कृत्रिम महागाई निर्माण करून उद्योग धार्जिण्या असणाऱ्या भाजप सरकारने अदानी-अंबानी यांचे खिसे भरण्याचा कार्यक्रम देशात सुरू केला आहे. देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ ही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असून सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकऱ्यांबरोबरच केंद्राच्या कामगार विरोधी कायद्यांमुळे कामगार देखील रस्त्यावरती आले आहेत. कधी नव्हे ते बेरोजगारीचा उच्चांक गाठला गेला असल्यामुळे युवा वर्ग हवालदिल झाला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज विविध शेतकरी संघटना, डावे यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या आदेशावरून काँग्रेसने पाठिंबा दिला असून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचा देखील या बंदला पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी जाहीर केले आहे.

Updated : 27 Sep 2021 5:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top