कर्नाटकनंतर तामिळनाडूतही अमूलची कोंडी
गुजरातमधील नामांकीत असणाऱ्या अमूल दूध कंपनीने सध्या भारतभर मोठ्याप्रमाणात विस्तार वाढवण्यास सुरवात केली आहे. पहिले नंदिनी विरुद्ध अमूल असा वाद सुरू होता. तर आता आविन विरुद्ध अमूल असा वाद सुरू आहे.
X
अमूल दूध कंपनीने भारतातील अनेक राज्यातील शेतकऱ्यांनकडून दूध खरेदी करण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यामध्ये कर्नाटक ,चेन्नई पाठोपाठ आता तामिळनाडू राज्यातून ही दूध विकत घेण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन अमूलच्या दूध खरेदीच्या विरोधात असून त्यांनी या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे.
आविन हा आमचा सर्वोच्च सहकारी विपणन महासंघ असून त्यांच्या दूध उत्पादन क्षेत्रातून अमूलने दूध खरेदी करणे हे अतिक्रमण आहे. त्यामुळे अमूलला तमिळनाडूतून दुधाची खरेदी करण्यापासून त्वरित रोखावे, असे स्टॅलिन यांनी शहा यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. अमूल तमिळनाडूमधून दूध खरेदी करत असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, असे स्टॅलिन यांनी शहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
तमिळनाडूमध्ये शीतकेंद्रे आणि प्रक्रिया कारखाने उभारण्यासाठी अमूल आपल्या बहुराज्यीय सहकारी परवान्याचा वापर करत आहे. तसेच कृष्णागिरी, धर्मापुरी, वेल्लोर, राणीपेट, तिरुपतूर, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक संघटना आणि अल्पबचत गटांच्या माध्यमातून दूध खरेदी करण्याचा अमूलचा प्रयत्न आहे, असेही स्टॅलिन यांनी शहा यांच्या निदर्शनास आणले आहे.
अमूलची घुसखोरी म्हणजे नेमकं काय?
सरकारच्या नियमावलीप्रमाणे सहकारी दूध संस्थांनी एकमेकांच्या दूध उत्पादन भागांमध्ये हस्तक्षेप न करता स्वतःचा व्यवसाय वाढवावा अशी तरतूद आहे. मात्र अमूलच्या या कृत्यामुळे सरकारी संस्थांमध्ये चढाओढ निर्माण होईल निर्माण होईल. या सर्व प्रकारांचा ग्राहकांना त्रास होईल. म्हणून आपण अमूलच्या खरेदीवर प्रतिबंध लावावा अशी मागणी स्टॅलिन यांनी या पत्राद्वारे केली आहे.
आविन’ काय आहे ?
आविन ही तमिळनाडूचा सहकारी भावना जपणारी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात ९,६७३ दूध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या सुमारे साडे चार लाख सदस्यांकडून ३५ लाख लिटर प्रतिदिन दूध खरेदी केली जाते. दूध उत्पादकांना वर्षभरात किफायतशीर आणि समान दर दिला जातो. सर्वात कमी दरात ग्राहकांना दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा करण्यात येतो.






