पालघरमध्ये होणार आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन

निसर्गाचे परंपरागत पूजक असलेला आदिवासी आपली भाषा, कला, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी तसेच जनसमूहाच्या अस्तित्व आणि न्यायहक्कांसाठी देशभरातील आदिवासी पालघरमध्ये एकत्र येणार आहेत. आदिवासी एकता परिषदेतर्फे १३,१४ आणि १५ जानेवारी या दरम्यान २७ वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी महासंमेलनात भव्य स्वरूपात काढल्या जाणाऱ्या सांस्कृतिक रॅलीच्या माध्यमातून तारपा, ढोल नाच, तसेच देशभरातील आदिवासी जनसमूहाची कला संस्कृतीचे दर्शन यावेळी पाहायला मिळणार आहे. या संमेलनात देशाच्या विविध भागांतून एक लाखाहून अधिक आदिवासी सहभागी होण्याची शक्यता आहे. या देशातील आदिवासी हे मूळ निवासी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं असताना भारतातील आदिवासींच्या अस्तित्वावर हल्ले होत आहेत. आदिवासींचे जल, जंगल व जमीन यावरील अधिकार नाकारले जात असून पाचव्या व सहाव्या अनुसूची अंतर्गत तसेच पेसा कायद्याने दिलेल्या ग्रामसभेचे अधिकार अशा संविधानात्मक तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आरोप आदिवासी समुदायाकडून करण्यात आले आहेत.

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला तरी विकासाच्या नावाखाली बुलेट ट्रेन प्रकल्प, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, बंदर मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, सागरी महामार्ग आदी प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासींना हद्दपार केलं जात असल्याचा आरोप आदिवासी संघटनेकडून केला जातोय. संपूर्ण देशात विकासाच्या नावाने राबवल्या जाणाऱ्या ‘विनाश नीती’च्या विरोधात आदिवासी एकता परिषदेतर्फे संघर्ष करण्यात येत आहे. या महासंमेलनाच्या निमित्ताने याविषयी चर्चा विनिमय करण्यात येणार असून देशात आदिवासी जमातीसाठी नेमकी काय नीती असावी यासाठी तरुण पिढीला या महासंमेलनात मार्गदशन करण्यात येणार आहे.

या महासंमेलनात देशभरातील आदिवासी सहभागी होणार आहेत. संमेलनात निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच जनसमूहाच्या अस्तित्वासाठी, न्याय हक्कासाठी विविध विषयांवर चर्चा महासंमेलनात होणार आहे. त्याचप्रमाणे या महासंमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपरिक अवजारे, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा या महासंमेलनात करण्यात येणार आहे. ‘आदिवासित्व’ हा या संमेलनाचा केंद्रबिंदू असेल. या महासंमेलनास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच दादरा नगरहवेली येथील हजारो आदीवासी पायी चालत या महासंमेलनात सहभागी होणार आहेत.