गुजरातमध्ये महाघोटाळा, २८ बँकांना २२ हजार ८४२ कोटींचा चुना
X
देशात आतापर्यंत उघड झालेल्या घोटाळ्यांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीने खळबळ उडाली असताना गुजरातमध्ये आणखी एका महाघोटाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक बँकांना फसवून पळून गेलेल्या नीरव मोदी, विजय माल्ल्या यांची नावं आपण ऐकली आहेत. पण या सगळ्यांना मागे टाकणारा महाघोटाळा गुजरातमध्ये समोर आला आहे. जवळपास २८ बँकांची २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ABG शिपयार्ड कंपनीविरोधात CBIने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने शनिवारी या कंपनीच्या ऑफिसेसवर छापे टाकले.
जहाज बांधणी आणि दुरूस्तीच्या व्यवसायात असलेल्या ABG शिपायार्ड आणि या कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे संचालक रिषी अग्रवाल, संथानम मुथूस्वामी आणि अश्विनी कुमार यांचा यामध्ये समावेश आहे. हा घोटाळा पंजाब नॅशनल बँक, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचे सांगितले जाते आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल २०१२ आणि जुलै २०१७ मध्ये झालेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा उघड झाला. यानुसार आरोपींनी संगनमताने बेकायदेशीररित्या पैसे इतरत्र वळवल्याचे उघड झाले आहे. बँकेकडून ज्या कारणाने पैसा घेतला गेला, त्याशिवाय इतर कामांसाठी हा पैसा वापरला गेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या कंपनीचे प्रमुख रिषी अग्रवाल आहे, तसेच देशातील जहाज बांधणी उद्योगात या कंपनीचा मोठा वाटा आहे. या कंपनीने गेल्या १६ वर्षात १६५ जहाजांची बांधणी केली आहे. यामध्ये ४६ जहाजांचा वापर निर्यातीसाठी केला गेला आहे. ABG शिपयार्ड कंपनीचे हेडक्वार्टर गुजरातमधीस सुरत आणि दहेजमध्ये आहे. तर दुसरीकडे एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतही काही ठिकाणी याप्रकरणी छापे टाकण्यात आले आहेत. या कंपनीवर स्टेट बँकेचे जवळपास ३ हजार कोटींचे कर्ज आहे, तर ICICI बँकेचे ७ हजार, IDBI ३ हजार ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदा सोळाशे कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे १२४४ कोटी रुपयांचे कर्ज आहे.