Home > News Update > लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी मंत्रीपुत्र चालवत होता, जखमी शेतकऱ्याचा दावा

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी मंत्रीपुत्र चालवत होता, जखमी शेतकऱ्याचा दावा

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी मंत्रीपुत्र चालवत होता, जखमी शेतकऱ्याचा दावा
X

उ. प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी कार केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा चालवत होता, असा दावा या घटनेतील जखमी शेतकऱ्याने दिला आहे. या घटनेत ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तेजिंदर विर्क असे या जखमी शेतकऱ्याचे नाव आहे आणि त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेच्या ७२ तासांनंतरही आरोपीला अटक न झाल्याबद्दल या शेतकऱ्याने खेद व्यक्त केला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. तेजिंदर विर्क या शेतकऱ्याने रविवारी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती

"आम्हाला मारुन टाकण्याचा कट होता. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करु देणार नाही, असा दावा अजय मिश्रा यांनी केला होता. या वक्तव्य़ाविरोधात आम्ही आंदोलन करत होतो. आम्ही सातत्याने पोलीस आणि प्रशासनाच्या संपर्कात होतो. रस्त्याच्या बाजूला उभे राहून आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो" असे गंभीर जखमी झालेल्या विर्क यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

"मंत्र्यांच्या दौऱ्याचा मार्ग बदलला असल्याचे आम्हाला सांगण्यात आल्यानंतर आम्ही शांततेने परतू लागलो होतो. अचानक मागून येणाऱ्या भरधाव कारने आम्हाला उडवलं. ताशी १०० किलोमीटर एवढा या गाडीचा वेग होता. त्यांनी जाणूनबुजून आमच्यावर कार घातली. अजय मिश्रा यांचा मुलगा आणि त्याचे कार्यकर्ते त्या गाडीमध्ये होते. त्यानंतर मी बेशुद्ध झालो." असेही विर्क यांनी सांगितले.

पण यानंतर संतापलेल्या समुहाने त्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. पण आमच्या काही लोकांनी त्यातील लोकांना वाचवले आणि पोलिसांच्या हवाली केले, असेही विर्क यांनी सांगितले. आपण साक्ष देण्यास तयार आहोत. योगी आदित्यनाथ सरकार हल्लेखोरांना वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे एक शेतकरी सिमरनजीत सिंग यांनी सांगितले की, "कारचा ताफा गर्दीमध्ये घुसला होता, गोळ्या चालवल्या जात होत्या तर काही जण पळून गेले, पण शेतकऱ्यांना उडवणारी गाडी कोण चालवत होते ते समजू दिसू शकले नाही." आपण लंगरची तयारी करत होतो, पण अचानक तीन भरधाव कार गर्दीत घुसल्या आणि त्यातील एका कारने शेतकऱ्यांना मागून अक्षरश: उडवले. त्या तीन कारमधून ५ ते ६ जण बाहेर आले आणि गोळीबार सुरू केला, असाही आरोप त्यांनी केला आहे. मृतांमध्ये १९ वर्षांच्या एका तरुणाचाही समावेश होता.

Updated : 6 Oct 2021 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top