Home > मॅक्स रिपोर्ट > डाकीण ठरवत विवस्त्र करुन महिलेचा छळ, अंनिसने पीडित महिलेला शोधले

डाकीण ठरवत विवस्त्र करुन महिलेचा छळ, अंनिसने पीडित महिलेला शोधले

डाकीण ठरवत विवस्त्र करुन महिलेचा छळ, अंनिसने पीडित महिलेला शोधले
X

एका महिलेला विवस्त्र करुन चटके दिले जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला डाकीण असल्याने तिला शिक्षा दिली जात असल्याची चर्चा होती. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून ही घटना कुठे घडली आहे आणि ही पीडित महिला कोण आहे, याचा शोध घेतला आहे. सदर महिला महाराष्ट्राच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील पानसेमल तालुक्यातील एका गावातली आहे. गावातील काही लोकांनी तिला डाकीण ठरवून अंगावर चटके देण्याची शिक्षा दिली होती.

या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सदर महिला तीस वर्षाची विवाहित तरुणी असून गेले बारा वर्ष मनोरुग्ण अवस्थेत गावातच हिंडत असते. नग्नावस्थेत चटक्यांची शिक्षा देऊन हे प्रकरण गावातच जातपंचायतीने मिटवल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने सदर गावाचा शोध घेतला आणि प्रत्यक्ष महिलेची भेट घेतली. महिला आणि तिचे कुटुंब अत्यंत गरिबीच्या अवस्थेत जगत आहेत. म्हातारे आई वडील व लहान भाऊ असा तिचा छोटा परिवार आहे. मजुरी करून जीवन जगणार्‍या या कुटुंबात सदर महिला बारा वर्षापासून मनोरुग्ण अवस्थेत आहे. अंधश्रद्धेच्या पायी या कुटुंबाने पीडित महिलेला अनेक बुवा-बाबा मांत्रिकांकडे फिरवत उपचार करण्याचा प्रयत्न केला, हजारो रुपये खर्च करूनही उपचार न झाल्याने त्या महिलेचा मानसिक आजार बरा होऊ शकलेला नाही.

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन त्या कुटुंबाला आधार दिला आणि मानसिक उपचारासाठी मदतीचीही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सदर तक्रार मध्यप्रदेश प्रशासनापर्यंत पोहोचून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत संघटना प्रयत्न करणार आहे. तसेच तेथील प्रशासनाच्या सहकार्याने डाकीण प्रथा विरोधी प्रबोधनाची मोहीम सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे. या पथकामध्ये महाराष्ट्र आणि अक्कलकुवा शाखा कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे, शहाद्याचे कार्यकर्ते के आर पाडवी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि आडगा चे पोलीस पाटील गौतम खर्डे उपस्थित होते.

Updated : 19 April 2022 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top