Home > News Update > मुलाच्या अंत्यविधीसाठी 500 रुपयांकरीता वेठबिगारी, छळाला कंटाळून मजुराची आत्महत्या

मुलाच्या अंत्यविधीसाठी 500 रुपयांकरीता वेठबिगारी, छळाला कंटाळून मजुराची आत्महत्या

मुलाच्या अंत्यविधीसाठी 500 रुपयांकरीता वेठबिगारी, छळाला कंटाळून मजुराची आत्महत्या
X

पालघर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही आदिवासी कातकरी शेत मजुराला वेठबिगारीच्या पाशात अडकल्याने जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करावी लागली. काळू पवार (४८) असे या दुर्दैवी कातकरी शेतमजुराचे नाव आहे.



त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी रामदास कोरडे या मालकाकडून ५०० रुपये उधार घेतले होते. ते पैसे फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळु याला गडी म्हणून राबवले आणि पिळवणूक केली. अखेर कंटाळून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात "बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष आणि श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. वेठबिगारीच्या पाशात अडकुन आत्महत्या करावी लागते, ही अत्यंत गंभीर व वेदनादायी आणि चीड आणणारी घटना आहे, असे पंडित यांनी म्हटले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे.

नेमके झाले काय?





मोखाडा तालुक्यातील आसे गावात कळू पवार व पत्नी सावित्री (४३), मोठी मुलगी धनश्री (१५) व धाकटी मुलगी दुर्गा (१३) हे कुटुंब शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. २०२० मध्ये दिवाळीच्या सणाच्या तोंडावर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू (१२) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना कधीच कळले नाही. परंतु, आपल्या पोटच्या गोळ्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठीही पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी करावी लागली, त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी म्हणून काम करत होता, असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

500 रुपयांसाठी गुलामगिरी





मुलाच्या कफनासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी काळू मालकाकडे गाडी म्हणून राबत होता. शेती नांगरणे, गुरे हाकणे अशी कामं तो करत असे. परंतु नहामी मालकाकडून त्याला मारहाण तसेच शिवीगाळ होत असे. आत्महत्येच्या दोन दिवस अगोदर तब्बेत ठीक नसल्यामुळे काळू कामावर गेला नाही म्हणून मालक रामदास याने त्याला मारहाण केली होती, त्यामुळे बाबा प्रचंड तणावात असल्याचे त्याची मुलगी धनश्रीने सांगितले. त्यामुळे मालक रामदास कोरडे याच्या जाचाला कंटाळून दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास काळू याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप आहे.

या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात "बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

Updated : 21 Aug 2021 4:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top