Home > News Update > महाठगाची कमाल, महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करुन फरार

महाठगाची कमाल, महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करुन फरार

महाठगाची कमाल, महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करुन फरार
X

पुणे : राजकारण्यांना कुणी फसवू शकत नाही, असे म्हटले जाते. पण पुण्यात मात्र एका महाठगाने चक्क चार महिला आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. मुकेश राठोड असे या तरुणाचे नाव आहे. महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुकेश राठोड हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या तीन महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोड याने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही त्याला ऑनलाइन पद्धतीने मदत केली.

मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करून त्याच्या आईला बाणेरमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. तसेच तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगुन आमदार माधुरी मिसाळ यांना गुगल पे नंबर देवून त्यावर ३,४००/- रु पाठवण्यास सांगितले. दरम्यान इतरही काही आमदारांकडून देखील अशीच रक्कम घेवून त्याने फसवणुक केल्याचा संशय आहे.

दरम्यान फसवणूक झालेल्या आमदारांमध्ये श्वेता महाले यांचेही नाव होते. पण त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित आरोपीने आपल्यालाही मदतीसाठी फोन केला होता. पण संबंधित तरूणाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर तो खोट बोलत असल्याचे लक्षात आले. एवढेच नाही तर तो आपल्या मतदारसंघातला असल्याचे त्याने खोटे सांगितल्याने आपण त्याला मदत केली नाही, त्यामुळे आपली कसलीही आर्थिक फसवणूक झालेली नाही, असे श्वेता महाले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अशा लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Updated : 19 July 2022 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top