Home > News Update > रोहयात दरड कोसळली, जीवितहानी नाही, दरडप्रवण क्षेत्राचा प्रश्न ऐरणीवर

रोहयात दरड कोसळली, जीवितहानी नाही, दरडप्रवण क्षेत्राचा प्रश्न ऐरणीवर

रोहयात दरड कोसळली, जीवितहानी नाही, दरडप्रवण क्षेत्राचा प्रश्न ऐरणीवर
X

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीची दरड दुर्घटना ताजी असतानाच रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड कोसळून डोंगराचा काही भाग ढासळलाय. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दगड गोटे घरावर धडकल्याने चंद्रकांत मुरकर यांच्या घराला तडे गेले. तर कुटुंबांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गावात ३०० घरे असून १२०० च्या वर लोकवस्ती आहे. दरड कोसळल्यानंतर प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी ११ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तिसे येथे गुरूवारी आणि शुक्रवारी दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे डोंगराचा काहीसा भाग जोरदार अचानक ढासळल्याने एकच खळबळ उडाली. पावसात रायगड जिल्ह्यात महाड येथील तळीये, नंतर इर्शाळवाडीच्या घटनेमुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. रोहा तालुक्यातील ही काही गावे डोंगर भागात तसेच पायथ्याशी आहेत. या घटनेमुळे गावांचा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





तर घटनेची माहिती मिळताच आ. अनिकेत तटकरे, कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे, स्थानिक प्रशासन, रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, मंडल अधिकारी गुंड, तलाठी केंद्रे तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना दिलासा दिला.

Updated : 9 Sep 2023 3:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top