Home > Fact Check > Fact Check | देशभरात दोन महिन्यांसाठी केलं जाणार Lockdown?

Fact Check | देशभरात दोन महिन्यांसाठी केलं जाणार Lockdown?

Fact Check | देशभरात दोन महिन्यांसाठी केलं जाणार Lockdown?
X

कोरोना व्हायरसचा प्रभाव देशभरात पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. यासोबतच शासकीय आणि खाजगी कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ मार्च रोजी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय.

असं असलं तरी कोरोनासोबत अफवांचा बाजारही गरम आहे. वेगवेगळ्या प्रकारची खोटी माहिती सध्या व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियातून व्हायरल आहे. सध्या एक ऑडीओ क्लिप सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल आहे. यामध्ये २ महिन्यांसाठी संपूर्ण देशभरात Lockdown केलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

ही ऑडीओ क्लिप ८ मिनीट ३४ सेकंदांची असून हिंदी भाषेतील आहे. त्यातील बोलण्यावरून ती राजस्थानातील असल्याचं समजतंय. यामध्ये दोन व्यक्तींचं संभाषण असून एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला देशात कोरोनाबाबतची परिस्थीती किती गंभीर आहे हे सांगत आहे.

कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता सध्या ३१ मार्चपर्यंत सर्व बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, देशातील परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून त्यासाठी १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचा दावा या ऑडीओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची तयारी म्हणून दोन महिन्यांसाठी रेशन, गॅस भरून ठेवण्याचा सल्लाही या क्लिपमध्ये बोलणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देत आहे.

तथ्य पडताळणी –

प्रथमदर्शनी या ऑडीओ क्लिपमधील तथ्य हे खोटे वाटले म्हणून ‘मॅक्स महाराष्ट्र’ने याबाबत पडताळणी करण्याचं ठरवलं. केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाकडून (PIB – Press Information Bureau) या व्हायरल होत असलेल्या ऑडीओ क्लिपमधल्या माहितीचं खंडण करण्यात आलंय.

अशाप्रकारे संपूर्ण देशभरात Lockdown करण्याचं कोणतंच नियोजन नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलंय. यासोबत अशा अफवा न पसरवण्याचं आवाहनही करण्यात आलंय.

पीआयबी ट्विट -

निष्कर्ष –

देशभरात १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा दावा करणारी ऑडीओ क्लिप खोटी असून त्यात कसलंच तथ्य नाही. अशाप्रकारचं कोणतंही नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात आलेलं नाही. या क्लिपमधली सर्व माहिती खोटी आहे.

‘मॅक्स महाराष्ट्र’चे अवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे अनेक खोटे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशा मेसेजमधून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करू नका. व्हायरल माहितीवर थोडा जरी संशय आला तरी आपण तथ्य पडताळणीसाठी आम्हाला पाठवू शकता. कोरोनासोबतच अफवा रोखण्याचं आव्हानही आपल्याला पेलावं लागणार आहे.

Updated : 21 March 2020 3:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top