Home > News Update > या दोघांनी ‘करून दाखवलं’!

या दोघांनी ‘करून दाखवलं’!

या दोघांनी ‘करून दाखवलं’!
X

राज्यात एका महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यानंतर अखेर महाविकास आघाडी तयार झाली आहे. महराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येणार आहे. शिवसेना,(Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस,(Nationalist Congress Party) काँग्रेसच्या (Congress) खूप मोठ्या संर्घषानंतर या ३ पक्षांची मिळून ही आघाडी तयार झाली आहे.

ही महाविकासआखाडी होण्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची भूमिका महत्वाची राहीली आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम राहात जनमानसात वातावरण तयार केलं. अनेक तर्कवितर्क लावले जात असताना त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि शेवट गोड केला.

संजय राऊत हे अगदी सुरुवातीपासूनच शिवसेनेची खिंड लढवत होते. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर भाजप जराशी बॅकफुटवर गेल्याचं पहायला मिळालं. समोरून काहीही उत्तरं आली तरी राऊत यांनी आपली भूमिका शेवटपर्यंत सोडली नाही. सततचे ट्विट्स आणि पत्रकार परिषदांमधून त्यांनी भाजपला चांगलंच जेरीस आणलं होतं.

हे ही वाचा...

हे तेच अजित पवार आहेत का?

‘सिल्वर ओक’वर महाविकासआघाडीची बैठक; मंत्रीमंडळाबाबत निर्णय होणार

उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; उद्या शपथविधी

मध्यंतरी अँन्जियोग्राफीसाठी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र, थांबतील ते राऊत कसले. रुग्णालयाच्या पलंगावर बसून त्यांनी सामनाचे अग्रलेख लिहीले. बाहेर घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. रुग्णालयात बसून त्यांचं ‘पॉलीटिकल मॅनेजमेंट’ सुरूच होतं. त्यांची रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, अहमद पटेल, शरद पवार यांच्या भेटी घेत महाविकास आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.

राष्ट्रवादीकडून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी जितेंद्र आव्हाडच पुढे होते. शरद पवारांसाठीचं ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ जितेंद्र आव्हाड यांनीच पाहिलं. आधी भाजपकडून आणि नंतर अजित पवारांकडून राष्ट्रवादीचे आमदार फूटू नये यासाठी आव्हाड यांनी काळजी घेतली.

आमदारांची जमवाजमव, त्यांचा सांभाळ करणं याची जबाबदारी आव्हाडांचीच होती. हॉटेल ट्रायडेंटमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना शपथ देण्याचं कामही जितेंद्र आव्हाड यांनी केलं. हॉटेल रेनेसान्समध्ये साध्या वेशात आलेल्या पोलिसांना जाब विचारल्याचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

संजय राऊत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहीलंय, ‘करून दाखवलं’. अर्थातच राज्यात पारंपारिक राजकीय समीकरणांच्या पलिकडे जाऊन नव्या आघाडीनं आकार घेतलाय. आता या महाविकास आघाडीचं सरकारही येतंय. त्यामुळे या दोन शिलेदारांनी खरंच ‘करून दाखवलं’ असंच म्हणावं लागेल.

Updated : 27 Nov 2019 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top