Home > News Update > 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर
X

नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर करण्यात आली. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर , मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनाचा समारोप 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शुक्रवार दि. 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँडपर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत ही दिंडी जाईल. त्यानंतर परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत येईल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजारोहण होईल. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. दरवर्षीप्रमाणे स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल. रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे.

तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर हे घेतील. महामंडळाच्या वतीने नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते होईल. संमेलनात 'संवाद लक्षवेधी कवींशी' हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान दुपारच्या सत्रात 'स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक' या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेचे सूत्रधार डॉ. एकनाथ पगार असणार आहेत. यात प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात कथा कथन कार्यक्रम विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. सायंकाळी कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे.

तर तिसऱ्या दिवशी परिसंवाद : सकाळी 'मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागे' शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वक्ते लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके, सुबोध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित करण्यात आले आहे. सकाळी 'शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका ' या भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये मंत्री बच्चू कडू, रमेश जाधव, मिलींद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी 'ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक' हा परिसंवाद डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. विलास साळुंके, मयूर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.

Updated : 25 Nov 2021 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top