Home > News Update > इर्शाळवाडीत अजूनही ७८ जण बेपत्ता, शोधकार्य सुरूच

इर्शाळवाडीत अजूनही ७८ जण बेपत्ता, शोधकार्य सुरूच

इर्शाळवाडीत अजूनही ७८ जण बेपत्ता, शोधकार्य सुरूच
X

78 people are still missing in Irshalwadi, search operation continues

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दुर्घटना घडून आता चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. तेथे प्रशासनाच्या वतीने खोदकाम सुरु ठेवण्यात आलेले आहे. मात्र जे ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत ते आता खरोखरच जिवंत सापडतील की नाही याबाबत सर्वांनाच साशंकता निर्माण झालेली आहे. अजूनही या ढिगाऱ्याखाली ७८ जण असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आतापर्यंत २७ मृतदेह हाती लागले आहेत. तर 100 हून अधिक जणांना सुखरुप वाचविण्यात यश आलेले आहे. अद्यापही शेकडोजण बेपत्ता असल्यानं मृतांची नेमकी संख्या अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पाऊस, दुर्गंधी यामुळे शोधकामात अडथळे येत आहेत. इर्शाळवाडीवर कोणतीही यंत्रसामुग्री नेणे अशक्य असल्याने मनुष्यबळाच्या माध्यमातूनच खोदकाम सुरु ठेवण्यात आलेले आहे. प्रशासकीय यंत्रणा यासाठी अखंडपणे काम करत आहेत.

इर्शाळवाडीत सर्व मिळून ४३ घरं होती. गावाची एकूण लोकसंख्या ही २२९ इतकी आहे. त्यापैकी २७ जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. मात्र, अजूनही ७८ जणांचा शोध सुरूच आहे.

ठाकरेंकडून विचारपूस

जे ग्रामस्थ या दुर्घटनेतून वाचले आहेत अशा लोकांचे वास्तव्य ज्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तेथे राजकीय पक्षांचे नेतेमंडळी,सामाजिक संस्था भेट देऊन त्यांची विचारपूस करत आहेत.शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आपदग्रस्तांशी संवाद साधला. दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अशा घटना घडू नयेत.. किंवा अशा आपत्ती आल्या तर त्याला एकत्रितपणे तोंड देण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इर्शाळवाडीतले जे लोक वाचले आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि भविष्यात डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांबाबत अशी घटना घडू नये म्हणून ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मी मुख्यमंत्री असताना दोन चक्रीवादळं आली होती. निसर्ग आणि तौक्ते.. तेव्हा किनारपट्टीचा धोका लक्षात घेऊन भूमिगत वीज योजना योजली होती. लोकांना चांगले निवारे तयार करण्याची योजना आखली होती. तसं आता यावर या सगळ्या वस्त्यांवर उपाय योजना केली पाहिजे. आपल्याकडे प्रशासन आहे, कलेक्टर, तलाठी, तहसीलदार सगळे आहेत. त्यांना बसवून मांडणी केली तर आपण ही संकटं टाळू शकतो. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सरकार कुणाचंही येवो, पण अशा योजनांना स्थगिती देता कामा नये इतकी माणुसकी आपण ठेवली पाहिजे.असे ते म्हणाले. तळियेला मी जाणार आहे तिथलाही आढावा घेणार आहे. आपण राजकारणी म्हणून जेव्हा मतं मागायला जातो तेव्हा लाज वाटली पाहिजे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. या सगळ्यांना घरं दिली तरीही त्यांच्या उदरनिर्वाहाचीही सोय केली गेली पाहिजे. या प्रकारच्या योजना आखल्या पाहिजे. सरकार येणं, निवडणुका होणं हे होतच राहिल पण अशा सगळ्यांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Updated : 23 July 2023 3:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top