#कोरोनाला हरवायचंय - रायगड जिल्ह्यात ५७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त
X
रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 840 झाली आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढली असली तरी 482 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. पण जिल्ह्यात सापडणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई परिसरातून आलेले आहेत. त्यांच्यावर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. दरम्यान अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, माणगाव इथे कोव्हिड सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. तर पनवेल आणि कामोठे इथे कोव्हिड हॉस्पिटल्स सुरु आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यापेक्षा त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, काही गावात स्थानिक गाव समित्यांकडून या नागरीकांना संस्थात्मक विलगीकरणात राहण्याची सक्ती केली जात आहे, पण घरात विलगीकरणाची व्यवस्था असेल तर त्या लोकांना आपआपल्या घरीच राहू दिले पाहीजे त्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जातील असेही जिल्हाधिकारी नीधी चौधरी यांनी सांगितले आहे.
परराज्यातील ९५ टक्के मजूर रवाना
रायगड जिल्ह्यात अडकून पडलेले ९५ टक्के परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतले आहेत. उर्वरीत मजूरांची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्यातून 34 श्रमिक ट्रेन पाठवण्यात आल्या आहेत. यात उत्तर प्रदेशसाठी ११, बिहार ८, झारखंड ५, मध्यप्रदेश ५, ओडिशा २, पश्चिम बंगालमधील दोन श्रमिक रेल्वेंचा समावेश होता. 53 हजार 548 मजूर यातून रवाना करण्यात आले. तर इतर राज्यात अडकलेल्या १२०० आदिवासीना सुखरूप परत आणण्यात आले.